पीटीआय, अयोध्या
प्रभू रामचंद्रांची शिकवण आणि रामराज्याच्या संकल्पनेमधून ‘सबका साथ सबका विकास’ याची प्रेरणा मिळाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. अयोध्येमध्ये दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या ‘दीपोत्सवा’त ते सहभागी झाले. यावेळी विक्रमी १८ लाख पणत्या एकाच वेळी प्रज्वलित करून रामजन्मभूमीत दिवाळीचा जल्लोष सुरू झाला.
येथील रामकथा मैदानात प्रभू रामचंद्र आणि माता सीता यांच्या प्रतिकात्मक राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. ‘‘अयोध्यावासी, उत्तर प्रदेश आणि सगळे जग हा सोहळा बघत असल्याचा आनंद आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना प्रभू रामचंद्रांसारखा निर्धार देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल,’’ असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते शरयू नदीची आरती करण्यात आली. अयोध्येतील दीपोत्सवाचे यंदा सहावे वर्ष आहे. शरयूकिनारी ‘राम की पैदी’ इथे १५ लाख पणत्यांची रोषणाई करण्यात आली तर अन्य ३ लाख पणत्या या शहरातील महत्त्वाच्या ठिकाणींवर मांडण्यात आल्या होत्या. यानिमित्त ‘लेझर शो’ आणि आकर्षक आतषबाजीही करण्यात आली. तत्पुर्वी पंतप्रधानांनी राममंदिराच्या बांधकामाची पाहणी केली आणि तात्पुरत्या मंदिरात पूजा केली.