रामलल्लाच्या स्वागती जय्यत तयारी सुरू झाली आहे. राम मंदिराच्या सजावटीला सुरुवात झाली असून हजारो भक्तगण मंदिराला भेट देत आहेत. तसंच, मंदिर प्रशासनाकडूनही नियोजन आढावा घेतला जात आहे. दरम्यान, राम मंदिराला भेट देण्याकरता येणाऱ्या भक्तांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अयोध्येत ट्रेनमार्गे जाणाऱ्या भक्तांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण, अयोध्या जंक्शनचे आता नामबदल करण्यात आले आहे. अयोध्या जंक्शनचं आता अयोध्या धाम जंक्शन करण्यात आलं आहे.

अयोध्येतील भाजप खासदार लल्लू सिंह यांनी बुधवारी (२७ डिसेंबर) फेसबूकवर पोस्ट करून ही माहिती दिली. २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असतील. याआधी ३० डिसेंबरला पंतप्रधान अयोध्येतील नवीन विमानतळ आणि नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करणार आहेत.

लल्लू सिंह यांनी एक्सवर माहिती दिली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली , लोकभावनेच्या अपेक्षेनुसार नव्याने बांधलेल्या भव्य अयोध्या रेल्वे स्थानकाचे अयोध्या जंक्शनचे नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन करण्यात आले आहे. त्याबद्दल, आदरणीय संत, अयोध्यावासीय आणि भक्तांच्या वतीने मी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी, गृहमंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो.

विमानतळाचंही होणार उद्घाटन

प्राण-प्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी अयोध्येत उत्साह संचारला आहे. त्याआधी, ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन विमानतळ आणि नव्याने बांधलेल्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील आणि अयोध्येला हजारो कोटी रुपयांचे प्रकल्पही भेट देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी जवळपासच्या जिल्ह्यातील लोकही अयोध्येत येणार आहेत.

या दौऱ्यात पंतप्रधान मोदी जाहीर सभेला संबोधित करतील, तसंच एक मोठा रोड शोही करणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत शहरवासीयांचे म्हणणे आहे की अयोध्येला पंतप्रधानांकडून विकास योजनांची भेट मिळेल. त्यामुळे मोदी-योगींच्या स्वागतासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत.

Story img Loader