प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा अयोध्येतील मंदिरात करण्यात आली. या मंदिरात ज्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली ती अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्ती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही प्राणप्रतिष्ठा केली. तसंच त्यानंतर त्यांनी भाषणही केलं. राम हे उर्जेचं आणि प्रगतीचं प्रतीक असल्याचं मोदी म्हणाले. रामाच्या मूर्तीला विविध दागिन्यांनी मढवण्यात आलं आहे. तसंच रामाचं जे वस्त्र आहे त्या वस्त्रालाही सोन्याची आणि चांदीची जर आहे. रामाला जे वस्त्र नेसवण्यात आलं आहे त्या वस्त्राला एक खास नाव देण्यात आलं आहे. याबाबत डिझायनर मनिष त्रिपाठींनी माहिती दिली.
काय म्हणाले डिझायनर मनिष त्रिपाठी?
“प्रभू रामाच्या पितांबराचं कापड आम्ही काशीहून आणलं आहे. या वस्त्रात वापरण्यात आलेली जर ही सोन्याची आणि चांदीची आहे. तसंच नक्षीकामही सोन्या-चांदीच्या जरीचीच आहे. पितांबरावर पद्म, चक्र, मयूर हे विणण्यात आलं आहे. पितांबर शिवण्यासाठी बारा ते पंधरा जणांची टीम काम करत होते. माझी टीम दिल्लीहून आली होती. एखाद्या सामान्य माणसासाठी पितांबर शिवणं आणि रामलल्लाच्या मूर्तीसाठी शिवणं हे थोडं आव्हानात्मक होतं. पण मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला ही संधी मिळाली. ” असं मनिष त्रिपाठी यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- प्रभू रामाची मूर्ती कोरली आहे कृष्ण शिळेत! कृष्ण शिळा म्हणजे काय? काय आहेत वैशिष्ट्ये?
रामाच्या पितांबराला देण्यात आलं खास नाव
यानंतर मनिष त्रिपाठी म्हणाले, प्रभू रामाला जो पितांबर नेसवण्यात आला आहे त्याला आम्ही शुभ वस्त्रम हे नाव दिलं आहे. प्रभू रामासाठी आम्हाला पितांबर शिवता आलं यासाठी आम्ही सगळेच स्वतःला भाग्यवान समजतो. पितांबर कुठल्या मूर्तीसाठी करायचं हे माहीत नव्हतं. कारण मूर्ती कुठली असणार हे ठरलं नव्हतं. जेव्हा रामाची आत्ताची मूर्ती प्राण प्रतिष्ठेसाठी निवडण्यात आली त्यानंतर आम्ही पितांबर शिवलं. एका मर्यादित वेळेत ते तयार केलं.
पितांबर शिवताना काय आव्हान होतं?
रामाच्या मूर्तीला काय शोभून दिसेल हे निवडणं काहीसं कठीण होतं. कारण हा सगळ्या लोकांच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा विषय होता. त्यामुळे आम्ही देवाकडे प्रार्थना करत होतो की आमच्या हातून चांगल्या वस्त्राची निर्मिती व्हावी. त्याप्रमाणेच हे वस्त्र तयार झालं. आम्ही यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. माझ्या आई-वडिलांनी आणि पत्नीने मला पाठिंबा दिला. तसंच चंपतराय यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो असंही त्रिपाठी यांनी म्हटलं आहे.