अयोध्या : अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळयासाठी धार्मिक विधींना आज, मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. १८ तारखेला श्रीरामाची मूर्ती गाभाऱ्यामध्ये स्थापित केली जाणार असून धार्मिक विधी २१ जानेवारीपर्यंत सुरू राहतील, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी दिली. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य सोहळयात २२ तारखेला दुपारी १२.२० वाजता सुरुवात होईल. हा विधी एक वाजेपर्यंत चालेल. संपूर्ण कार्यक्रम ६५ ते ७५ मिनिटांचा असेल, अशी माहिती राय यांनी दिली. या सोहळयाचा मुहूर्त वाराणसीमधील ज्ञानेश्वर शास्त्री द्रविड यांनी काढला आहे. धार्मिक विधी वाराणसी येथील लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली १२१ पुरोहित करणार आहेत. ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे ती पाषाणात घडविलेली असून १८ जानेवारीला ही मूर्ती गाभाऱ्यात ठेवली जाईल. कार्यक्रमाच्या तयारीसाठी २० व २१ जानेवारी रोजी सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन बंद राहील. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सात अधिवास आहेत असे राय यांनी नमूद केले. 

हेही वाचा >>> गातील पहिल्या ५ श्रीमंतांची संपत्ती दुप्पट, ५ अब्ज आणखी गरीब

प्राणप्रतिष्ठा विधीप्रसंगी गाभाऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, सर्व विश्वस्त तसेच विविध परंपरेतील दीडशेहून अधिक संत-महंत उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर मान्यवरांची भाषणे होणार आहेत. खेळाडू, वैज्ञानिक, राजदूत, साहित्यिक, कलाकार, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी यांना सोहळयाचे आमंत्रण देण्यात आले आहे. याखेरीज मंदिर उभारणीच्या कामात सहभागी असलेले अभियंते व कामगारही सोहळयात सहभागी होणार आहेत. त्यासाठी आठ हजार खुर्च्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान

मानसरोवर, गंगोत्री, हरिद्वार, अमरनाथ, प्रयागराज, नर्मदा, गोदावरी, गोकर्ण अशा विविध स्थळांवरून अभिषेकासाठी जल आणल्याचे राय यांनी सांगितले. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी विविध ठिकाणांहून जल, मृदा, सोने, चांदी, वस्त्रे आली आहेत. कार्यक्रमापूर्वी नागरिकांनी स्थानिक मंदिरांमध्ये स्वच्छता करावी तसेच प्राणप्रतिष्ठा झाल्यावर शंखध्वनी करावा व प्रसाद वाटप करावे, असे आवाहन राय यांनी केले आहे.

मूर्ती निश्चित

मैसुरू येथील अरुण योगीराज यांनी घडवलेली श्रीरामाची मूर्ती मंदिरातील प्राणप्रतिष्ठेसाठी निवडण्यात आल्याची माहिती राय यांनी दिली. तीन मूर्तीमधून या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. ही रामाची उभी मूर्ती पाच फूट उंचीची असून ती पाच वर्षांच्या बालकाच्या रुपातील आहे. तसेच गेल्या ७० वर्षांपासून पूजा होत असलेली मूर्तीदेखील गाभाऱ्यात ठेवली जाणार असल्याचे राय यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayodhya ram lalla idol placement in garbha griha on jan 18 rituals to start from today zws