Ayodhya Raam Lala Consecation: अयोध्येतील राम मंदिराच्या आंदोलनात आघाडीवर असलेले भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे त्यांच्या प्रकृती आणि वयामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या राममंदिराच्या अभिषेक सोहळ्यात उपस्थित राहण्याची शक्यता नाही, असे मंदिराच्या ट्रस्टने सोमवारी सांगितले आहे. राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पत्रकारांना सांगितले की, “दोघेही या कुटुंबातील वरिष्ठ आहेत आणि त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना न येण्याची विनंती करण्यात आली होती, जी दोघांनीही मान्य केली होती. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या अभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. १५ जानेवारीपर्यंत तयारी पूर्ण केली जाईल आणि प्राणप्रतिष्ठापनेची पूजा १६ जानेवारीपासून सुरू होईल आणि २२ जानेवारीपर्यंत चालू असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निमंत्रितांची तपशीलवार यादी देताना राय म्हणाले की, अडवाणी आणि जोशी कदाचित आरोग्य आणि वयाशी संबंधित कारणांमुळे अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. आडवाणी आता ९६ वर्षांचे आहेत आणि जोशी पुढच्या महिन्यात ९० वर्षांचे होतील.

अयोध्येचे राम मंदिर, आडवाणींचा लढा

१९८५ साली अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडून भाजपाची सूत्रे हाती आल्यानंतर आडवाणी यांनी १९८९ साली अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून आव्हानात्मक मोहिम राबवली. हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे भाजपा अधिवेशनात राम मंदिर उभारणीचा ठराव संमत करण्यात आला. हा ठराव भाजपा आणि देशातील रामभक्तांसाठी ऐतिहासिक ठरला. राम मंदिरासाठी लालकृष्ण आडवाणी यांनी रथयात्रा अभियान राबवायचा ठरवल्यावर तत्कालीन रणनीतीकार प्रमोद महाजन यांनी या रथयात्रेची कल्पना सुचवली होती. त्यानुसार, लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्त्वाखाली १९९० साली रथयात्रेतून राम मंदिराच्या उभारणीची माहिती शहरांत, खेडोपाड्यांत पोहोचली होती.

भाजपच्या प्रभावी मोहिमांपैकी एक बहुचर्चित ठरलेली ही रथयात्रा तितकीच वादग्रस्त सुद्धा ठरली होती. बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी या रथयात्रेला रोखले होते. तर काही ठिकाणी यात्रेतून दिल्या जाणाऱ्या घोषणा या मुस्लिमविरोधी असल्याचे म्हटले गेले होते.

रथयात्रेमुळे देशभरातील विविध राज्यांत धार्मिक हिंसाचार उफाळला. परिणामी अयोध्येत मोठ्या संख्येने जमाव जमला. याची परिणीती ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती.

अयोध्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण कोणाला?

माजी पंतप्रधान देवेगौडा यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांना समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी तीन सदस्यीय चमू तयार करण्यात आल्याचे राय यांनी सांगितले.यासह शंकराचार्य सुद्धा सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यासाठी सुमारे ४००० ऋषी आणि २२०० इतर पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये काशी विश्वनाथ, वैष्णोदेवी यांसारख्या मंदिरांचे प्रमुख आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे.

अध्यात्मिक गुरु दलाई लामा, केरळच्या माता अमृतानंदमयी, योगगुरू बाबा रामदेव, सिनेस्टार रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अरुण गोविल, चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि प्रसिद्ध उद्योगपती जसे मुकेश अंबानी, अनिल अंबानी, सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव, निलेश देसाई आणि इतर अनेक मान्यवरांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

अयोध्येत भव्य दिव्य सोहळ्याची तयारी कशी सुरु आहे?

राय म्हणाले की, अभिषेक सोहळ्यानंतर २४ जानेवारीपासून विधी परंपरेनुसार ४८ दिवस ‘मंडप पूजा’ होणार आहे. २३ जानेवारीला मंदिर भाविकांसाठी खुले केले जाईल. अयोध्येत तीनहून अधिक ठिकाणी पाहुण्यांच्या मुक्कामाची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय विविध मठ, मंदिरे आणि घरगुती कुटुंबांनी ६०० खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

हे ही वाचा<< गाजलेली रथयात्रा अन् ‘तो’ ऐतिहासिक ठराव, राम जन्मभूमी आंदोलनात लालकृष्ण आडवाणींची निर्णायक भूमिका; जाणून घ्या…

दरम्यान, अयोध्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी अभिषेक सोहळ्याची तयारी सुरू केली आहे. पीटीआयशी बोलताना महापालिका आयुक्त विशाल सिंह म्हणाले की, भाविकांसाठी फायबर टॉयलेट बसवले जातील आणि महिलांसाठी नेमलेल्या ठिकाणी चेंजिंग रूम उभारण्यात येतील. राम जन्मभूमी संकुलात ‘राम कथा कुंज’ कॉरिडॉर तयार केला जाईल, ज्यात प्रभू रामाच्या जीवनातील १०८ घटना दर्शविणारी एक चित्रफीत दाखवली जाईल, .

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayodhya ram mandir bjp leaders lal krushna advani and manohar joshi requested not to come modi ambani guest list for programme svs
Show comments