अयोध्या : २२ जानेवारी ही केवळ एक तारीख नाही, तर ही नव्या कालचक्राची सुरुवात ठरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. अयोध्येतील मंदिरामध्ये रामचंद्राच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा त्यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी ‘देवापासून देशाकडे’ आणि ‘रामापासून राष्ट्राकडे’ असा नवा मंत्र दिला.
सोमवारी नियोजित वेळी, दुपारी १२.२० वाजता पंतप्रधानांच्या हस्ते राममूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला. या वेळी गाभाऱ्यामध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मंदिराचे प्रमुख पुजारी उपस्थित होते. हे विधी पार पडल्यानंतर सोहळयासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या सुमारे आठ हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि साधुसंतांसमोर पंतप्रधानांनी भाषण केले. ‘‘प्रभू रामांनी समुद्र ओलांडला त्या क्षणी कालचक्र बदलले होते. रविवारी धनुषकोडी येथे त्याचा अनुभव घेण्याचा माझा प्रयत्न होता. मला विश्वास आहे की, जसे त्या वेळी कालचक्र बदलले होते, तसेच आता पुन्हा बदलेल आणि शुभ दिशेने मार्गक्रमणा करेल,’’ असे ते म्हणाले. रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा ही एका नव्या युगाची सुरुवात असून पुढील एक हजार वर्षे कणखर आणि पवित्र भारताची पायाभरणी करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
हेही वाचा >>> विश्वगुरू होण्यासाठी एकजूट ठेवा! अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सरसंघचालकांचे आवाहन
आपल्या भाषणाची सुरुवात ‘‘सियावर रामचंद्र की जय’’ अशा घोषणेने करून पंतप्रधान म्हणाले की, आज अनेक पिढयांच्या प्रतीक्षेनंतर राम आला आहे. आमचा रामलल्ला यापुढे तंबूमध्ये राहणार नाही, तर भव्य मंदिरात राहील. रामचंद्राच्या आशीर्वादानेच आम्हाला या क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली आहे. ‘‘आमच्या प्रयत्नांमध्ये कमतरता राहिल्यामुळे याला एवढा मोठा काळ लागल्याबद्दल मी रामाची माफी मागतो. मात्र आता ती कमतरता दूर झाली आहे. त्यामुळे रामचंद्र आपल्याला माफ करतील याची खात्री आहे,’’ असे पंतप्रधान म्हणाले. हा विजयाचाच क्षण नाही, तर विनयाचाही आहे. राम मंदिराला विरोध करणाऱ्यांनी येथे यावे आणि गाभाऱ्यामध्ये असताना आपल्याला आलेल्या दिव्य अनुभूतीचा अनुभव घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या प्राणप्रतिष्ठा सोहळयासाठी राजकारणी, चित्रपट उद्योगातील दिग्गज, अनेक ज्येष्ठ साहित्यिक, उद्योजक, खेळाडू यांच्यासह विविध पंथांचे शेकडो साधुसंत असे सुमारे आठ हजार निमंत्रित उपस्थित होते. हेमा मालिनी, कंगना रनौत, रजनीकांत, मधुर भांडारकर, सुभाष घई, सोनू निगम, आचार्य श्री श्री रविशंकर, मोरारी बापू आदी मान्यवर रविवारीच अयोध्येमध्ये दाखल झाले होते. सोमवारी सकाळी अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, अनुपम खेर, कैलाश खेर, प्रसून जोशी, अनिल अंबानी, मुकेश अंबानी आदींचे आगमन झाले. कार्यक्रमस्थळी मान्यवरांचे स्वागत रामनामाचा शेला आणि छोटी घंटा देऊन करण्यात आले. आरतीच्या वेळी सर्व उपस्थितांनी घंटानाद केला.
‘मंगल ध्वनी’ने वातावरण भक्तिमय
प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होण्यापूर्वी ५० पारंपरिक वाद्यांमधून साकारलेल्या ‘मंगल ध्वनी’ने राम मंदिराचा परिसर संपूर्णत: भक्तिमय झाला होता. अयोध्येतील प्रसिद्ध कवी यितद्र मिश्रा यांनी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीच्या साहाय्याने याचे संयोजन केले होते. यात महाराष्ट्रातील सुंदरी या वाद्यासह उत्तर प्रदेशातील बासरी, पखवाज, ढोलक, कर्नाटकातील वीणा, पंजाबमधील अल्गोजा, ओडिशातील मार्दला, मध्य प्रदेशातील संतूर, मणिपूरमधील पंग, आसाममधील नगारा व काली तसेच छत्तीसगडमधील तंबोऱ्याचा समावेश होता.
हे भव्य मंदिर भारताचा उत्कर्ष, भारताच्या उदयाचे साक्षीदार ठरेल. लक्ष्य निश्चित असेल आणि त्यासाठी सामूहिक व संघटन शक्तीने प्रयत्न केला, तर ते साध्य होते याचे हे मंदिर साक्ष आहे. आपण सर्वांनी या क्षणाची दीर्घ प्रतीक्षा केली आहे. आता आपण थांबणार नाही. आपण विकासाच्या नव्या उंचीवर निश्चित पोहोचू.. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान