Ayodhya Ram Mandir Invites: श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीत होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठीच्या नियोजनाविषयी माहिती दिली. २२ जानेवारीला नियोजित या भव्य दिव्य सोहळ्याचे नियोजन सांगताना राय यांनी निमंत्रितांची सविस्तर यादी सुद्धा सांगितली. कलाकार, कवी, उद्योगपती, डॉक्टर, शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. आम्ही राममंदिर संघर्षात प्राण गमावलेल्या करसेवकांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करत आहोत असे, अयोध्येत पत्रकार परिषदेत बोलताना, विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष व मंदिर समितीचे सरचिटणीस राय म्हणाले.
अयोध्या राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाचे आमंत्रण कोणाला?
मुख्य समारंभासाठी विश्व हिंदू परिषदेचे सुमारे १०० सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या २५ अधिकाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. तर माजी पंतप्रधान देवेगौडा यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांना समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी तीन सदस्यीय चमू तयार करण्यात आल्याचे राय यांनी सांगितले. यासह शंकराचार्य सुद्धा सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यासाठी सुमारे ४००० ऋषी आणि २२०० इतर पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये काशी विश्वनाथ, वैष्णोदेवी यांसारख्या मंदिरांचे प्रमुख आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे.
राम मंदिराच्या भव्य उद्घाटन कार्यक्रमासाठी अनेक सेलिब्रिटींना सुद्धा आमंत्रण पाठवण्यात आले आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली सारखे खेळाडू, रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अरुण गोविल, चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर हे सिनेसृष्टीतील कलाकार, अध्यात्मिक गुरु दलाई लामा, केरळच्या माता अमृतानंदमयी, योगगुरू बाबा रामदेव, तर मुकेश अंबानी व काही उद्योगपती सुद्धा निमंत्रितांच्या यादीत आहेत.
अयोध्या राम मंदिर भाविकांसाठी कधी खुले होणार?
दरम्यान, १५ जानेवारीपर्यंत या सोहळ्याची तयारी पूर्ण केली जाईल आणि प्राणप्रतिष्ठापनेची पूजा १६ जानेवारीपासून सुरू होईल आणि २२ जानेवारीपर्यंत चालू असेल. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील मंदिराच्या उद्घाटनाला लक्ष्मीकांत दीक्षित, एक वैदिक पुजारी यांच्यासमवेत उपस्थित राहतील आणि त्या दिवशी अभिषेक समारंभाचे मुख्य विधी पार पाडतील. अभिषेक सोहळ्यानंतर २४ जानेवारीपासून विधी परंपरेनुसार ४८ दिवस ‘मंडप पूजा’ होणार आहे. २३ जानेवारीला मंदिर भाविकांसाठी खुले केले जाईल.