Ayodhya Ram Mandir : येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पाडणार आहे. यावेळी प्रभू रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राम मंदिराचा विषय सगळीकडे चर्चेत आहे.सोशल मीडियावर राम मंदिराचे नवनवीन फोटो व्हायरल होताना दिसताहेत.१०० हून अधिक वर्षे ज्या राम मंदिरासाठी देशात वाद सुरू होता, तो आता संपुष्टात आला असून राम मंदिराच्या उद्घाटनाने एक नवी सुरुवात दिसून येईल. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेक जण उत्सूक आहेत.या आनंदाच्या क्षणी रामनगरी अयोध्येत दिवा लावून दिवाळी साजरी करण्यात येईल. काही लोकं घरीच रामज्योती म्हणजेच दिवा लावून आनंद साजरा करणार आहे. अशातच मुस्लिम महिला सुद्धा अयोध्येतून काशीला रामज्योती घेऊन येईल आणि काशीत सुद्धा लख्ख दिव्यांच्या आरास करुन दिवाळी साजरी केली जाणार आहे.
अयोध्येच्या राम मंदिरातून रामज्योती आणण्याची जबाबदारी रामभक्त डॉ.नानजीन अंसारी आणि डॉ. नजमा परवीन यांच्यावर सोपवली आहे. २२ जानेवारीला उद्घाटनाच्या दिवशी अयोध्येसह काशी सुद्धा रामज्योतीनी सजलेली दिसेल. रामज्योतीने फक्त हिंदू घरे प्रकाशमय होणार नाही तर काशीतील मुस्लीम घरे सुद्धा प्रकाशमय होतील.
अयोध्यातील पीठाधीश्वर महंत शंभू देवाचार्य डॉ. नानजीन अंसारी आणि डॉ. नजमा परवीन यांना रामज्योती देणार आहेत. रविवारी रामज्योती घेऊन त्या काशीला येणार. काशीला परत येताना जौनपूरमध्ये अनेक मुस्लिम कुटूंब यांचे स्वागत करतील. काशीमध्ये १५० मुस्लीम याच रामज्योतीपासून दिवे लावणार.
२००६ मध्ये संकट मोचन हनुमान मंदिरावर बॉम्बस्फोट झाल्यानंतर डॉ.नानजीन अंसारी आणि डॉ. नजमा परवीन यांनी काशीमध्ये ७० मुस्लिम महिलांना एकत्रित घेऊन शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी उचलली होती आणि त्यावेळी या मुस्लिम महिलांबरोबर त्यांनी हनुमान चालीसाचे पठन केले होते. तेव्हा पासून आजही त्या १०० मुस्लिम महिलांना घेऊन दर वर्षी रामनवमी आणि दिवाळीला श्री रामाची आरती करतात.