२२ जानेवारी या दिवशी राम मंदिराच्या गाभाऱ्यात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. रामलल्लाची मूर्तीही गाभाऱ्यात असणार आहे आणि मुख्य मूर्तीही गाभाऱ्यात असणार आहे. गाभाऱ्यात ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे त्याविषयीचा निर्णय झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मूर्तीकार अरुण योगीराज यांनी घडवलेली रामाची मूर्ती गाभाऱ्यात बसवली जाणार आहे. यानंतर अरुण योगीराज यांच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. रामाच्या मूर्तीसह मूर्तीकार अरुण योगीराज दिसत आहेत. मात्र हीच मूर्ती रामाच्या मंदिरात बसवली जाणार आहे का? याविषयी त्यांनी भाष्य केलेलं नाही. अरुण योगीराज यांचा या मूर्तीसह असलेला फोटो मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
अरुण योगीराज यांच्या आईने काय म्हटलं आहे?
“आज अरुणचे वडील हयात असते तर त्यांना या गोष्टीचा खूप आनंद झाला असता. अरुणने साकारलेल्या रामाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून भक्त येतील. यापेक्षा मोठा आनंद काय? ” असं अरुण योगीराज यांच्या आई सरस्वती योगीराज यांनी म्हटलं आहे. ही प्रतिक्रिया देताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.
अरुण यांच्या पत्नीने काय म्हटलं आहे?
अरुण योगीराज यांच्या पत्नी विजेता यांनी म्हटलं आहे की, “आज मला खूप आनंद झाला आहे. माझे पती अरुण योगीराज यांनी मला व्हिडीओ कॉल करुन सांगितलं की त्यांनी केलेली मूर्ती निवडली गेली आहे. अरुण हे त्यांचं काम अत्यंत निष्ठेने करतात. जोपर्यंत त्यांना मूर्तीत देव दिसत नाही तोपर्यंत ते काम करत असतात” असंही त्यांच्या पत्नीने सांगितलं.
हे पण वाचा- अयोध्येच्या राम मंदिरात स्थापन होणारी मूर्ती ठरली; मूर्तीकार अरूण योगीराज यांनी साकारलं प्रभू श्रीरामाचं लोभस रूप
समोर आलेल्या फोटोत काय?
ANI च्या वृत्तानुसार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रामाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी मूर्ती ठरली असं म्हटलं आहे. “अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या अभिषेकासाठी मूर्तीची निवड निश्चित झाली आहे. आपल्या देशातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगी यांनी तयार केलेल्या रामाच्या मूर्तीची अयोध्येत स्थापना केली जाणार आहे.” असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच जो फोटो पोस्ट करण्यात आला आहे त्यात मूर्तीकार अरुण योगीराज रामाच्या मूर्तीसह दिसत आहेत. राम, लक्ष्मण आणि सीता तसंच त्यांच्या पायाशी हनुमान अशी ही मूर्ती आहे. या मूर्तीचं रुप अत्यंत देखणं आणि खास आहे.