नवी दिल्ली : काँग्रेसमधील बंडखोर ‘जी-२३’ गटाचे नेते गुलामनबी आझाद यांनी शुक्रवारी माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका करत पक्षाचा राजीनामा दिला. आझाद यांनी गांधी कुटुंबावर थेट प्रहार केल्यामुळे सामंजस्याची शक्यता संपुष्टात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आझाद नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले जाते.
‘‘रिमोट कंट्रोल पद्धतीने यूपीए सरकारची विश्वासार्हता संपुष्टात आली होती, आता काँग्रेसमध्येच हा प्रयोग केला जात आहे. सोनिया गांधी या केवळ नामधारी अध्यक्ष असून सर्व निर्णय राहुल गांधी वा त्यांचे सुरक्षारक्षक किंवा खासगी सचिव घेत आहेत,’’ अशी कठोर टीका आझाद यांनी सोनिया गांधींना पाठवलेल्या पाच पानी राजीनामापत्रात केली आहे. राहुल गांधी अधिकृत पक्षाध्यक्ष नसले तरी, त्यांच्या संमतीशिवाय पक्षात कोणतेही निर्णय घेतले जात नसल्याची तक्रार ज्येष्ठ नेते सातत्याने करत आहेत.
संघटनात्मक बदल करण्याबरोबरच पक्ष कार्यकर्त्यांसाठी पूर्णवेळ उपलब्ध अध्यक्ष नियुक्त करण्याची मागणी ‘जी-२३’ गटाने केली होती. सोनिया गांधी यांना ऑगस्ट २०२० मध्ये लिहिलेल्या पत्रानंतर बंडखोर गटाचा पक्षांतर्गत संघर्ष सुरू होता. या गटाचे म्होरके असलेले आझाद यांनी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त करून अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
हुजऱ्यांचा गोतावळा
२०१३ मध्ये पक्षाच्या उपाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यापासून राहुल गांधी यांनी ज्येष्ठ नेत्यांना दूर केले. सोनिया गांधी यांनी तयार केलेली सल्लागारांची यंत्रणा नष्ट केली आणि हुजऱ्यांचा गोतावळा जमा केला. सध्या काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुका होत असल्या तरी, हे निव्वळ नाटक असल्याची टिप्पणीही आझाद यांनी केली आहे.
‘आधी काँग्रेस जोडो यात्रा हाती घ्या’
काँग्रेस मुख्यालयात बसलेल्या अनुयायांनी बनवलेल्या याद्यांवर पदाधिकाऱ्यांच्या फक्त स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत. हा बनाव म्हणजे निवडणूक नव्हे. अनुभवी नेत्यांना बाजूला केले गेले आहे. कुठलाही अनुभव नसलेले होयबा पक्ष चालवू लागले आहेत, असे आझाद यांनी म्हटले आहे. उदयपूरच्या चिंतन शिबिरात पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेल्या घोषणेनुसार काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा ७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. काँग्रेसने भाजपविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असला तरी, आधी ‘काँग्रेस जोडो’ यात्रा हाती घ्यावी, असा उपहासही आझाद यांनी राजीनामापत्रात केला आहे.
बालिशपणाचे कृत्य..
राहुल गांधी यांच्याकडे राजकीय परिपक्वता नाही. त्यांचे वागणे बालिश असल्याची टीकाही आझाद यांनी केली आहे. ‘‘प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडणे, हे राहुल गांधी यांच्या अपरिपक्वतेचे ज्वलंत उदाहरण होते. या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानेच नव्हे तर राष्ट्रपतींनीही मान्यता दिली होती. त्यांच्या ‘बालिश’ वागण्याने पंतप्रधान आणि सरकारचा अधिकार झुगारला गेला. २०१४ मधील काँग्रेसच्या पराभवामागे राहुल गांधींची ही कृती हेही एक प्रमुख कारण आहे.’’ अशा शब्दांत आझाद यांनी वाभाडे काढले.
२०१४ पासून राहुल यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचा दोन लोकसभा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव झाला. २०१४ ते २२ या काळात ४९ विधानसभा निवडणुकांपैकी ३९ मध्ये काँग्रेस पराभूत झाला. पक्षाने फक्त चार राज्यांच्या निवडणुका जिंकल्या. सहा राज्यांमध्ये युती करून सरकारमध्ये सामील व्हावे लागले. आता फक्त दोन राज्यांत काँग्रेसचे सरकार आहे. २०१९ नंतर पक्ष सातत्याने कमकुवत झाला आहे. राहुल गांधींनी तिरीमिरीत पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला खरा, पण त्याआधी त्यांनी ज्येष्ठ नेत्यांचा अपमान केला होता, अशी आठवणही आझाद यांनी पत्रात नमूद केली आहे.
संवादाऐवजी हल्लाबोल
‘जी-२३’ गटाने ऑगस्ट २०२० मध्ये सोनियांना पत्र लिहून पक्षसंघटनेत सुधारणा करण्याची विनंती केली होती. पण पक्षनेतृत्वाचा अनुनय करणाऱ्यांनी आमच्यावर हल्ला केला. आम्हाला अपमानित केले. जम्मूमध्ये माझी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा आदेश दिला गेला. त्यांचा दिल्लीत सन्मान केला गेला. चेल्यांच्या गुंडांनी कपिल सिबल यांच्या घरावर हल्ला केला. पक्ष संघटना मजबूत करण्याची मागणी करणे, हाच आमचा गुन्हा ठरला. आमच्याशी रचनात्मक चर्चा करण्याऐवजी कार्यकारिणीच्या बैठकीत अपमानास्पद वागणूक दिली गेली, अशी भावनाही आझाद यांनी पत्रात व्यक्त केली.
आणखी नेता..
इंदिरा गांधी यांच्या काळापासून कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या राजीनाम्याने पक्षाला जबर धक्का बसला आहे. कपिल सिबल, अमिरदर सिंग, ज्योतिरादित्य शिंदे, सुनील जाखड, आरपीएन सिंह, जितीन प्रसाद, अश्वनी कुमार अशा अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर नाराज होत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. सचिन पायलट, मनिष तिवारी, शशी थरुर या नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. सोनिया, प्रियंका आणि राहुल गांधी परदेशात आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उद्या, रविवारी कार्यकारिणीची बैठक होणार असून आझादांच्या राजीनाम्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
आझाद यांची आरोपास्त्रे..
- सोनिया गांधी केवळ नामधारी अध्यक्ष असून सर्व निर्णय राहुल गांधी वा त्यांचे सुरक्षारक्षक किंवा खासगी सचिव घेत आहेत..
- २०१३ मध्ये पक्षाच्या उपाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी ज्येष्ठ नेत्यांना दूर केले. सोनिया गांधी यांनी तयार केलेली सल्लागारांची यंत्रणा नष्ट केली, हुजऱ्यांचा गोतावळा जमा केला.
- राहुल यांच्याकडे राजकीय परिपक्वता नाही. त्यांचे वागणे बालिश आहे. ‘‘प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडणे, हे त्यांच्या अपरिपक्वतेचे ज्वलंत उदाहरण आहे. २०१४मधील काँग्रेसच्या पराभवामागे त्यांची ही कृती हेही एक प्रमुख कारण होते.
- राहुल यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचा दोन लोकसभा निवडणुकीत लाजीरवाणा पराभव झाला. २०१४ ते २२ या काळात ४९ विधानसभा निवडणुकांपैकी ३९ मध्ये पक्ष पराभूत झाला.
- राहुल यांनी तिरीमिरीत पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला खरा पण, त्याआधी त्यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा अपमान केला होता.
आझादांचा डीएनए ‘मोदी-फाइड’: रमेश
गुलाम नबी आझाद यांच्या राजीनामापत्रावर काँग्रेसने भाष्य केले नसले तरी, आझादांचा डीएनए ‘मोदी-फाइड’ झाल्याची टीका पक्षाचे माध्यमप्रमुख आणि खासदार जयराम रमेश यांनी केली. आझाद यांचे राजीनामापत्र प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचल्यानंतर काँग्रेसचे नेते अजय माकन आणि जयराम रमेश यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आझादांचा निर्णय खेदजनक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
जम्मू-काश्मीरमध्ये तीव्र प्रतिक्रिया
जम्मू : आझाद यांच्या राजीनाम्याचे जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटले. दोन माजी मंत्र्यांसह पक्षाच्या पाच वरीष्ठ नेत्यांनीही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यात माजी मंत्री आर. एस. चिब आणि जी. एम. सरूरी, माजी आमदार मोहम्मद अमिन भट, माजी आमदार नरेश गुप्ता आणि पक्षनेते सलमान निझामी यांनी आझाद यांच्या समर्थनार्थ पक्ष सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली.