स्वत:च्या बदनामीला स्वत:ची प्रसिध्दी बनवशील तर समाजात कोणत्या तोंडाने फिरशील, या शब्दांत उत्तर प्रदेशमधील मंत्री आजम खान यांनी भरसभेत एका बलात्कारपीडित महिलेला अपमानित केले. आजम खान यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांची सर्वत्र निंदा होत आहे. कानपूरमधील एका सभेत आजम खान सहभागी झाले होते. याचवेळी एक पीडित महिला त्यांच्याकडे गेली आणि पोलिसांविरुद्ध तक्रार करू लागली. महिलेचा त्रागा पाहून सुरक्षारक्षकांनी तिला अडविले आणि बघताबघता मंचावर एकच गोंधळ उडाला. आजम खान यांनी या महिलेला पाहताच कसली आरडाओरड सुरु आहे, अशी विचारणा केली. आपण पीडित महिलेचे म्हणणे सरकारदरबारी घेऊन जाऊ. परंतु यामुळे तिची एवढी बदनामी होईल की ती समाजाला आपला चेहरा कसा दाखवू शकेल, अशाप्रकारचे वक्तव्य त्यांनी केले. आजम खान यांच्या या वक्तव्यावर सभेतील काही लोकांनी निर्लज्जपणे टाळ्यादेखील वाजविल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजम खान यांच्या वक्तव्यावर मतप्रदर्शन करताना भाजप नेता लक्ष्मीकांत वाजपेयी म्हणाले, ज्यावेळी ही महिला त्यांच्याकडे आपले म्हणणे मांडायला गेली होती, त्यावेळी तिला अपमानित करणारे मतप्रदर्शन सार्वजनिक ठिकाणी न करता तिचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे होते. आजम खान यांच्या अपमानजनक वक्तव्यामुळे आपण व्यथित झाल्याने यापुढे त्यांच्याकडे कधीही जाणार नसल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.

आजम खान यांच्याकडे तक्रार करायला गेलेल्या महिलेवर चार महिन्यांपूर्वी चालत्या ट्रेनमध्ये सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी केवळ छेडछाडीचे प्रकरण म्हणून नोंदवून घेतले. हे दुष्कर्म करणारे मोकाट फिरत असून, तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत असल्याचा आरोप महिलेने केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Azam khan said to rape victim how will you show your face if you complain rape