पीटीआय, रामपूर
उत्तर प्रदेशमधील रामपूर न्यायालयाने बुधवारी समाजवादी पक्षाचे (एसपी) ज्येष्ठ नेते माजी मंत्री आझम खान, त्यांची पत्नी तजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला आझम यांना २०१९ मध्ये दाखल झालेल्या बनावट जन्म प्रमाणपत्रप्रकरणी दोषी ठरवले आणि त्यांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
खासदार-आमदार न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी शोभित बन्सल यांनी आझम खान, त्यांची पत्नी आणि मुलाला बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात सात वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. निकालानंतर तिघांनाही न्यायालयीन कोठडीत घेण्यात आले आणि न्यायालयातूनच कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. रामपूरचे भाजपचे आमदार आकाश सक्सेना यांनी ३ जानेवारी २०१९ रोजी गंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यात आरोप केला होता, की आझम खान आणि त्यांची पत्नी ताजीन यांनी त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांना दोन बनावट जन्म प्रमाणपत्रे मिळवून देण्यास मदत केली होती.
हेही वाचा >>>शरद पवार यांचे नव्हे, तर पंतप्रधानांचे अदानींना संरक्षण; राहुल गांधी यांचा आरोप
‘निर्णय आणि न्याय यात फरक’
शिक्षा सुनावल्यानंतर बाहेर आल्यानंतर रामपूर कारागृहाच्या मुख्य द्वारासमोर पत्रकारांशी बोलताना आझम खान यांनी सांगितले, की आज निर्णय झाला आहे. मात्र निर्णय आणि न्याय यात फरक आहे. काय निर्णय होणार आहे, हे अवघ्या शहराला समजले होते. कदाचित तुम्ही हा निर्णय आधीच वाचला असावा. आम्हाला मात्र हा निर्णय आजच समजला.