विप्रोचे संचालक अजीम प्रेमजी यांचा वार्षिक मानधनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ६३ टक्के घट झाली आहे. कोणत्याही प्रकारचं कमिशन न मिळाल्यानं त्यांच्या मानधनात मोठी घट नोंदवली गेली आहे. प्रेमजी यांचं वार्षिक मानधन यावर्षी १ लाख २१ हजार ८५३ डॉलर अर्थात भारतीय रूपयांप्रमाणे सुमारे ७९ लाख रूपये इतके होते. मागच्या आर्थिक वर्षात प्रेमजी यांचं मानधन ३ लाख २७ हजार ९९३ डॉलर म्हणजेच भारतीय चलनाप्रमाणे २ कोटी १७ लाख रूपये होते. अमेरिकेतल्या विनिमय आयोगानं दिलेल्या माहितीनुसार प्रेमजी यांना २०१६-१७ या वर्षात ६६ हजार ४६४ डॉलर मानधन, ४१ हजार ७४२ रूपये भत्ता आणि १३ हजार६४७ डॉलरचं दीर्घकालीन पॅकेज मिळालं होतं. मात्र ३१ मार्च २०१७ ला जो आर्थिक आढावा घेण्यात आला त्यात प्रेमजी यांचं कमिशन शून्य टक्के होतं. त्यामुळे त्यांच्या मानधनात थोडी थोडकी नाही तर ६३ टक्के घट झाली. गेल्या काही वर्षांपासून IT सेक्टरच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या पगारात घट झाल्याची बातम्याच समोर येत आहेत. इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांच्या मानधनातही ६७ टक्के कपात झाली आहे. त्यांना मानधनाच्या रूपात ४८ कोटी ७३ लाख रूपये मिळणार होते.. मात्र त्यांना फक्त १६ कोटी १ लाख रूपयेच मानधन म्हणून मिळाले. २०१५-१६ या वर्षात प्रेमजी यांना १ लाख ३९ हजार ६३४ डॉलर कमिशनच्या रूपानं मिळाले होते. मात्र मागचं आर्थिक वर्ष हे प्रेमजी यांच्यासाठी तोटा करणारं ठरलं. आयटी सेक्टरनं एकेकाळी पगारात आणलेली मोठी लाट आता काही प्रमाणात ओसरताना दिसते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आयटी सेक्टरमध्ये म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. तसंच मोठ्या पगारांवर असलेल्या अनेकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून टांगती तलवार असणारं ठरतं आहे. जिथे एकीकडे विप्रो किंवा इन्फोसिस सारख्या बड्या कंपन्यांच्या संचालकानांच फटका बसलेला दिसून येतोय तिथे इतर कर्मचाऱ्यांची आणि बड्या अधिकाऱ्यांची काय अवस्था होत असेल? हा विचारच केलेला बरा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा