पीटीआय, बंगळूरु
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा सोमवारी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) दाखल गुन्ह्यासंदर्भात चौकशीसाठी गुन्हे अन्वेषण विभागासमोर (सीआयडी) हजर झाले. कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी १४ मार्चच्या या खटल्याप्रकरणात येडियुरप्पा यांना अटक करण्यास ‘सीआयडी’ला प्रतिबंध केला होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार येडियुरप्पा यांच्याविरोधात १७ वर्षीय मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोक्सो कायदा, २०१२ आणि भारतीय दंड संहितेच्या अनुच्छेद ३५४ अ (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ फेब्रुवारी २०२४ रोजी येथील डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत येडियुरप्पा यांनी त्यांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे, परंतु येडियुरप्पा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, पीडितेच्या भावाने या प्रकरणात गेल्या आठवडय़ात न्यायालयामध्ये याचिका दाखल करत तीन महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही तपासात कोणतीही प्रगती झाली नाही. येडियुरप्पा यांना अटक करून त्यांची चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>इस्रायलचे युद्ध मंत्रिमंडळ बरखास्त; खासदार बेनी गँट्झ सरकारमधून बाहेर पडल्यानंतर निर्णय
मार्चमध्ये सदाशिवनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्नाटकचे पोलीस महासंचालक अलोक मोहन यांनी या प्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडे सोपवला. दरम्यान, येडियुरप्पांविरोधात तक्रार करणाऱ्या पीडितेच्या ५४ वर्षीय आईचे गेल्याच महिन्यात फुप्फुसाच्या कर्करोगाने खासगी रुग्णालयात निधन झाले. एप्रिलमध्ये ‘सीआयडी’ने येडियुरप्पा यांना चौकशीसाठी बोलावून त्यांच्या आवाजाचे नमुने घेतले.