कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येड्डियुरप्पा यांनी आपण पुन्हा स्वगृही परतण्यास उत्सुक असल्याचे स्पष्ट संकेत शनिवारी दिले. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नावाला पाठिंबा देऊन येड्डियुरप्पा यांनी आपल्या कर्नाटक जनता पक्षाला एनडीएमध्ये सामावून घेण्याबाबत विचार करावा, असे आवाहन केले.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना पाठविलेल्या पत्रात येड्डियुरप्पा यांनी आपल्या पक्षाला एनडीएमध्ये सामावून घेण्याची आणि सर्व बैठकांसाठी आपल्या पक्षाला निमंत्रित करण्याची, विनंती केली आहे. कर्नाटक जनता पक्ष भाजपमध्ये विलीन होणार नाही, असे येड्डियुरप्पा सातत्याने सांगत होते त्या पाश्र्वभूमीवर त्यांनी एनडीएला पाठविलेले पत्र चर्चेचा विषय बनला आहे. कर्नाटक खाण घोटाळ्यानंतर येड्डियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्यात आले होते. येड्डियुरप्पा यांना पक्षात पुनप्र्रवेश देण्याबाबत राज्य भाजपमध्ये मतभेद आहेत.
कर्नाटक जनता पक्षाच्या कार्यकारिणीने एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला असल्याचे येड्डियुरप्पा यांनी पत्रात म्हटले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना देशाचे भावी पंतप्रधान करण्याचा निर्धार एनडीएने केला असून त्यासाठी कर्नाटक जनता पक्ष सहकार्य करणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे.