Baba Ramdev on Kanwar Yatra order : उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून राज्यातील कावड यात्रेच्या मार्गावर असलेल्या सर्व भोजनालयांच्या मालकांनी आपापली नावे दर्शनी भागात लावावीत, असा आदेश देण्यात आला आहे. उत्तरप्रदेशनंतर उत्तराखंड आणि उज्जैन मनपानेही अशाच प्रकारचा आदेश काढला आहे. विरोधकांनी या निर्णयावरून टीका केली असली तरी योग गुरू आणि व्यावसायिक बाबा रामदेव यांनी मात्र या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. बाबा रामदेव म्हणाले, “जर रामदेवला आपली ओळख जाहीर करण्यात काही अडचण वाटत नाही, मग रेहमानला काय अडचण आहे.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाबा रामदेव नेमके काय म्हणाले?

“मला माझी रामदेव ही ओळख उघड करण्यात कोणतीही अडचण वाटत नाही, मग रहमानला काय अडचण वाटत असावी? प्रत्येकाला त्याच्या नावाचा अभिमान वाटला पाहीजे. नाव लपविण्याची कोणतीही गरज नाही, तुम्ही तुमचे काम मनापासून करणे जास्त महत्त्वाचे आहे. जर आपले काम आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करत असू तर मग हिंदू असो किंवा मुस्लीम किंवा इतर धर्माचे असो, त्याने काहीही फरक पडत नाही”, अशी प्रतिक्रिया बाबा रामदेव यांनी रविवारी सकाळी दिली.

हे वाचा >> हिंदू नावे धारण करुन होते मांसविक्री? योगी सरकारने सर्व खाद्यविक्रेत्यांना दिले ओळख उघड करण्याचे आदेश

उज्जैन मनपाने काय निर्णय घेतला?

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड नंतर उज्जैन महानगरपालिकेनेही असाच एक निर्णय घेतला आहे. दुकानदारांनी त्यांचे खरे नाव दुकानावर जाहीर करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. उज्जैन मनपाचे महापौर मुकेश टटवाल शनिवारी म्हणाले, ज्या या नियमाचे उल्लंघन करतील त्यांना २,००० रुपयांचा दंड भरावा लागेल. जर त्याच दुकानदाराने पुन्हा गुन्हा केल्यास त्याला ५,००० रुपयांचा दंड भरावा लागेल.

“उज्जैन हे धार्मिक शहर आहे. लोक येथे आस्था घेऊन येतात. त्यामुळे त्यांना दुकानाचा मालक कोण आहे? हे जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यांच्या आस्थेचा प्रश्न आहे. ग्राहकांची दिशाभूल किंवा फसवणूक होऊ नये, यासाठी हा निर्णय योग्य आहे”, अशी प्रतिक्रिया महापौर मुकेश टटवाल यांनी दिली.

हे ही वाचा >> Kartik Kansal UPSC : चारवेळा यूपीएससी पास होऊनही दिव्यांग कार्तिकला मिळाली नाही पोस्टिंग; बोगस प्रमाणपत्र असणाऱ्यांना मात्र…

विरोधकांकडून टीका

कावड यात्रेच्या मार्गावरील दुकानाच्या पाट्या बदलण्याबाबत जो निर्णय घेतला गेला, त्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, भारतात मुस्लीमांच्या विरोधात द्वेष वाढत असल्याचे हे द्योतक आहे. ओवेसी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, “यूपीच्या कावड यात्रा मार्गावर दहशतीचे वातावरण आहे. भारतात मुस्लीम समाजाचा द्वेष वाढत असल्याचे हे उदाहरण आहे. याचे श्रेय राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी नेते आणि तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांना जाते.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba ramdev backs kanwar yatra order says why should rahman kvg
Show comments