करोनाच्या दुसऱ्या लाटेनं आरोग्य व्यवस्थेवर अभूतपूर्व ताण पडला. यात रात्रंदिवस रुग्णसेवा करणाऱ्या कोविड योद्ध्या डॉक्टरांनाही प्राण गमवावे लागले. देशातील करोना परिस्थितीवरून सगळीकडे चिंता व्यक्त होत असतानाच बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथी डॉक्टराची थट्टा उडवणारं विधान केलं होतं. त्यावरून बाबा रामदेव विरुद्ध आयएमए असा वाद उभा राहिला असून, यात आता साध्वी प्राची यांनी उडी घेतली आहे. साध्वी प्राची यांनी ‘आयएमए’वर टीका करतानाच मदर तेरेसाबद्दलही आपत्तीजनक विधान केलं आहे.
बाबा रामदेव अॅलोपॅथी उपचार पद्धती आणि अॅलोपॅथी डॉक्टरांची चेष्टा करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओतील विधानावरून बराच बाद पेटला. इतकंच नाही, तर आयएमएने यावर संताप व्यक्त करत बाबा रामदेव यांना मानहानीची नोटीसही पाठवली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र दिलं आहे. हा सगळा वाद सुरू असतानाच यात आता भाजपाच्या नेत्या साध्वी प्राची यांनी उडी घेत अॅलोपॅथी डॉक्टरांची देशातील शिखर संघटना असलेल्या ‘आयएमए’वर टीका केली आहे. साध्वी प्राची यांनी या वादात मदर तेरेसा यांनाही ओढलं असून, त्यांच्याबद्दलही आपत्तीजनक विधान केलं आहे.
“रामकृष्ण यादव, तुम्ही खरं बोललात… तुमचा बाप आणि भाऊ, तर…; महुआ मोईत्रा भडकल्या
भाजपा नेत्या साध्वी प्राची यांनी एका व्हिडीओतून ही भूमिका मांडली आहे. “आयएमएच्या माध्यमातून १९८२मध्ये एक एनजीओ (स्वयंसेवी संस्था) बनवली गेली होती. भारतात मदर तेरेसा नावाची एक जादूगार होती, जी लोकांना स्पर्श करूनच बरं करायची. त्यांचा मृत्यूही रुग्णालयात झाला होता,” असं साध्वी प्राची यांनी म्हटलं आहे.
Ayurveda vs Allopathy : आयएमएचं योगगुरू रामदेव बाबांना खुल्या चर्चेचं आव्हान!
“बाबा रामदेव यांनी कोट्यवधी लोकांना बरं केलं आहे. आयएमएच्या लोकांनो लक्ष देऊन ऐका, वाटीभर पाण्यात बुडून मरा. लाज वाटू द्या. आयुर्वेदावर चिखलफेक करणाऱ्यांनो नीट ऐका, बाबा रामदेव देशासाठी खूप मोठं कार्य करत आहेत. ते कोट्यवधी लोकांना बरं करत आहेत. भारतात धर्मांतराचा खेळ सुरू असून, केंद्र सरकारने यावर कठोर कारवाई करावी. माठातील पाण्यामुळे कुणीही आजारी पडत नाही, फ्रीजमधील पाण्याने पडतं. हे आयुर्वेद सांगत, पण परदेशी कंपन्यांचे दलाल ख्रिश्चन लोक याचा विरोध करतात,” असं साध्वी प्राची यांनी म्हटलं आहे.