देशभरामध्ये करोनाचा फैलाव झालेला असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’नं केवळ चार महिन्यांच्या कालावधीमध्ये ८५ लाखांहून अधिक कोरोनिल किट विकले आहेत. कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार चार महिन्यांच्या कालावधीमध्ये कंपनीने कोरोनिल विकून अंदाजे २४१ कोटी कमवले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंपनीच्या अधिकृत आकडेवारीनुसार  २३ जून ते १८ ऑक्टोबरदरम्यान एकूण २३ लाख ५४ हजार कोरोनिल किटची विक्री झाल्याचे नमूद करण्यात आलं आहे, असं द प्रिंटने दिलेल्या वृत्तात म्हटलंय. करोनावरील आयुर्वेदिक औषध असा कोरोनिलचा प्रचार कंपनीकडून करण्यात आला होता. रामदेव बाबा आणि ‘पतांजली’चे आचार्य बालकृष्ण यांनी २३ जूनला या औषधाची घोषणा केली. हे औषध करोनावर खरोखरच प्रभावी आहे की नाही यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. करोनावर प्रभावी ठरणारे औषध असा दावा केल्यामुळे हे औषध वादात सापडलं होतं. कंपनीने या औषधाचे क्लिनिकल ट्रायल केलं आहे की नाही यासंदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यात आले.

कंपनीने कोरोनिलची निर्मिती करण्याआधी सर्दी, खोकला, ताप आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध बनवण्याचा परवाना सरकारकडून घेतला होता. २४ जून रोजी उत्तराखंडमधील आयुष विभागाने ‘पतंजली’ला नोटीस पाठवून यासंदर्भात सात दिवसात उत्तर देण्याच्या सूचना केल्या होत्या. उत्तराखंडच्या आयुष विभागाच्या परवाना विभागातील आधिकाऱ्यांनी स्वत: समोर येऊन ‘पतंजली’ला रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध तयार करण्याची परवानगी आम्ही दिली होती असं म्हटलं होतं.

तर दुसरीकडे या औषधाची घोषणा करण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये रामदेव यांनी हे औषध ‘पतंजली’च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असेल असं सांगितलं होतं. ऑनलाइन माध्यमातूनही हे औषध मागवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. ऑर्डर केल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये हे औषध घरपोच दिले जाईल असा दावा कंपनीने केला होता. या औषधाची किंमत ५४५ रुपये ठेवण्यात आली होती.

योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने करोना सात दिवसांत पूर्णपणे बरा करणारे पहिले आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केल्यानंतर आयुष मंत्रालयाने तातडीने जारी केलेल्या आदेशाद्वारे ‘पतंजली’ला या औषधाची जाहिरात करण्यास मनाई केली होती. ‘आयुष’ने ‘पतंजली’कडे या औषधातील घटकांचा तपशील मागवला होता. यानंतर महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये या औषधावर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, ‘पतंजली’चे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना, “आम्ही वैद्यकीय चाचणीपूर्वी करोनिल गोळ्यांना कधीही वैद्यकीय रित्या आणि कायदेशीररित्या करोनाचं औषध म्हटलं नाही,” असं म्हटलं होतं.

यापूर्वी ‘पतंजली’ने ‘कोरोनिल’ या नावाचा वापर केल्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायायलयाने कंपनीला १० लाखांचा दंड केला आहे. तसेच कंपनीने या शब्दाचा वापर बंद करण्याचा आदेशही कंपनीला दिला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba ramdev patanjali coronil a big hit sales total an estimated rs 241 crore scsg