अ‍ॅलोपॅथीबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या योगगुरू रामदेव बाबा यांचा आणखीन एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये बाबा रामदेव यांनी डॉक्टरांसंदर्भात वक्तव्य करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ बाबा रामदेव यांच्या एका योग अभ्यास वर्गातील आहे. व्हिडीओमध्ये रामदेव योगा करता करता योगसाधना करणाऱ्यांशी गप्पा मारताना दिसत आहेत. मात्र बोलता बोलता त्यांनी करोनाशी लढत असताना मरण पावलेल्या डॉक्टरांबद्दल वक्तव्य केलं असून आता हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

एक हजार डॉक्टर करोनाच्या दोन्ही लसी घेतल्यानंतरही मेले आहेत, असं बाबा रामदेव या व्हिडीओत सांगताना दिसतात. जे लोक स्वत:ला वाचवू शकत नाहीत ते कसले डॉक्टर?, असा प्रश्नही बाबा रामदेव यांनी उपस्थित केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच रामदेव हे डॉक्टरांवर उपहासात्मक वक्तव्य करताना दिसतात. “तिसरा म्हणाला मला डॉक्टर व्हायचं आहे. टर…टर…टर…टर…टर…टर… डॉक्टर बनायचं आहे. एक हजार डॉक्टर तर आता करोनाच्या दोन्ही लसी घेतल्यानंतर मरण पावले. किती डॉक्टर? एक हजार… कालची बातमी आहे. स्वत:लाच वाचवू शकत नाहीत हे कसले डॉक्टर”, असं रामदेव यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना, “डॉक्टर बनायचं असलं तर स्वामी रामदेवसारखं बना. ज्यांच्याकडे कोणतीही पदवी नाहीय तरी ते सर्वांचे डॉक्टर आहेत. कोणत्याही पदवी शिवाय, दैवत्वाशिवाय मात्र प्रतिष्ठेसहीत मी एक डॉक्टर आहे,” असं रामदेव म्हणतात दिसतात. काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर रागिनी नायक यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. नायक यांनी रामदेव यांचा उल्लेख ढोंगी असा केलाय. “जर तुम्ही अशा खोट्या, निर्लज्जपणे आणि संवेदनशून्य पद्धती बोलणाऱ्याविरोधात आहात तर मोदी सरकारला ओरडून सांगा की बाबा रामदेव यांना अटक करा,” असं नायक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अ‍ॅलोपॅथीसंदर्भातील त्या विधानावरुन वाद…

अ‍ॅलोपॅथीच्या विधानावरून रामदेव यांनी सोमवारी आपली चूक कबूल केली. व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केलेला मेसेज वाचून केलेले “अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” हे विधान आपण मागे घेतल्याचे रामदेव यांनी जाहीर केलं. रामदेव यांचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं होतं. ‘अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान असून रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधे करोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत,’’ असे वक्तव्य रामदेवबाबा यांनी केलं होतं. त्याला डॉक्टरांच्या ‘भारतीय वैद्यकीय संघटने’ने (आयएमए) आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर अ‍ॅलोपॅथिक औषधे घेऊन लाखो रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या रामदेवबाबांच्या विधानावरही ‘आयएमए’ने आक्षेप नोंदवला आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रामदेवबाबांना वक्तव्य मागे घेण्यास सांगितलं होतं. अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधे करोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत. अ‍ॅलोपॅथिक औषधे घेऊन लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशा विधानां उल्लेख रामदेव यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये होता. रामदेव यांनी हे विधान मागे घेत असल्याचं सोमवारी जाहीर केलं.

Story img Loader