Lawrence Bishnoi Viral Video Call to Shahzad Bhatti: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मुंबईतील प्रमुख नेते बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. यामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगनं या हत्येची जबाबदारी स्वीकारली असून कनेक्शन थेट सलमान खानशी जोडलं आहे. पण एकीकडे या प्रकरणाचा तपास चालू असताना दुसरीकडे लॉरेन्स बिश्नोईचा तुरुंगातला एक व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लॉरेन्स बिश्नोईनं पाकिस्तानातील गँगस्टर शाहजाद भट्टीला व्हिडीओ कॉल केल्याचं दिसत आहे. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई त्याची गँग तुरुंगातून चालवत असल्याच्या चर्चेला बळ मिळालं आहे.
लॉरेन्स बिश्नोईला तुरुंगात सोयी-सुविधा?
लॉरेन्स बिश्नोईनं पाकिस्तानी गँगस्टर शाहजाद भट्टीला व्हिडीओ कॉल करून ईदच्या शुभेच्छा दिल्याचा व्हिडीओ जून महिन्यात सर्वप्रथम व्हायरल झाला होता. व्हिडीओत शाहजाद भट्टीच्या हातातल्या फोनवर पलीकडून लॉरेन्स बिश्नोई व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बोलत असल्याचं दिसत होतं. पण या काळात लॉरेन्स बिश्नोई अहमदाबाद जेलमध्येच होता. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोईला तुरुंगात गँग चालवण्यासाठीच्या सोयीसुविधा कशा उपलब्ध होतात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याच्या तुरुंगातील व्यवस्थेबाबत इंडिया टुडेनं सविस्तर वृत्त दिलं आहे.
लॉरेन्स बिश्नोईचा ९ दिवस उपवास
या वृत्तानुसार, सध्या लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात ९ दिवसांचा उपवास करत आहे. त्याच्या आधीच्या गुन्ह्यांमधील माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोई गँग कोणताही मोठा गुन्हा करण्याआधी खुद्द लॉरेन्स बिश्नोई अशा प्रकारे उपवास करतो. त्यामुळे बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणाचा संबंध या उपवासाशी जोडला जात आहे. तसेच, सध्या ३१ वर्षांचा असणारा लॉरेन्स कधीच बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्यासाठी स्वत:चा मोबाईल वापरत नसून तो इतर कैदी किंवा त्याच्या विश्वासातल्या काही लोकांचे फोन वापरतो, असंही या वृत्तात म्हटलं आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येबाबतही त्याला तुरुंगातच माहिती मिळाल्याचं सांगितलं जातं. त्यानं अशाच प्रकारे दिल्लीच्या तिहार जेलपासून पंजाब व हरियाणातील तुरुंगातही मोबाईलचा वापर केल्याचे दावे केले जातात. मात्र, तुरुंग प्रशासनानं हे दावे फेटाळून लावले आहेत.
बाबा सिद्दिकींची हत्या…
१२ ऑक्टोबरला बाबा सिद्दिकींची हत्या झाल्यानंतर ४८ तासांत शुबू लोणकर नावाच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून लॉरेन्स बिश्नोई गँगनं या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याची पोस्ट करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी लोणकरला अटक केली आहे. मात्र, अद्याप या पोस्टची विश्वासार्हता तपासण्यात आलेली नाही. या पोस्टमध्ये सलमान खानचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या कुठल्या व्यक्तीला जीवे मारलं, तर त्याची परतफेड होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
लॉरेन्स बिश्नोई विरुद्ध सलमान.. २६ वर्षांचं वैर!
१९९८ साली अभिनेता सलमान खाननं राजस्थानमध्ये दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप करण्यात आला. त्यासंदर्भात रीतसर खटला चालला आणि त्यातून सलमान खानची जामिनावर सुटका झाली. पण या घटनेपासून लॉरेन्स बिश्नोई गँगनं सलमान खानविरोधात मोहीमच उघडली. बिश्नोई समुदाय काळवीटांना पवित्र मानतो. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोईनं सलमान खानला वारंवार धमक्या दिल्याचं पाहायला मिळतं. काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घरावर बिश्नोई गँगच्या दोन सदस्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हा पोलिसांनी दोघांना अटक केली होती. त्यातल्या एका व्यक्तीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यावरूनही बरीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.
सध्या लॉरेन्स बिश्नोई हा अहमदाबादमधील साबरमती तुरुंगात असून त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई, गोल्डी ब्रार व रोहित गोदार हे अमेरिकेतून लॉरेन्स बिश्नोई गँगचं काम चालवत असल्याचं सांगितलं जातं.