गर्भाशयात असतानाच बाळांना आईचा आवाज समजतो, जेव्हा आई गोष्ट वाचते तेव्हा बाळ ते लक्ष देऊन ऐकत असते असे एका संशोधनात आढळून आले आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील संशोधकांनी ३६ आठवडय़ांच्या ७४ गर्भवती महिलांना दोन मिनिटे पुस्तकातील गोष्ट वाचायला सांगितली. त्यानंतर त्यांच्या गर्भाशयातील बाळांच्या हृदयाचे ठोके व हालचाली यांचे निरीक्षण करण्यात आले. त्यात असे निदर्शनास आले, की आई गोष्ट वाचत असताना गर्भाशयात असलेल्या बाळांनी हालचाल थांबवली व त्यांच्या हृदयाचे ठोकेही मंदावले.
प्रमुख संशोधक क्रिस्टीन व्होगटलाइन यांनी सांगितले, की गर्भ मातेचा आवाज ओळखण्यास कसा शिकतो व त्याला जन्मापूर्वीपासूनच कसा प्रतिसाद देतो हे मोठे गमतीशीर आहे. या प्रयोगातील काही स्त्रिया पुस्तक मोठय़ाने वाचण्यापूर्वी डुलकी घेत होत्या, पुस्तक वाचन सुरू करताच गर्भानेही सावध होऊन ऐकण्यास सुरुवात केली. त्यांच्या हृदयाचे ठोके कमी झाले व हालचाली मंदावल्या.
या मातांच्या गर्भाशयात असलेल्या गर्भाची श्रवण संस्था परिपक्व होती व ते खात्रीशीरपणे आवाज ओळखत होते व त्याला प्रतिसादही देत होते, असे व्होगटलाइन यांनी ‘हेराल्ड सन’ला सांगितले.
विशेष म्हणजे आईच्या आवाजाने गर्भावस्थेतील बाळाची श्रवण यंत्रणा विकसित होण्यासही मदत होत असते. इनफँट बिहेवियर अँड डेव्हलपमेंट जर्नल या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा