Sakshi Malik on Wrestlers’ Protest: सुमारे वर्षभराहून अधिक काळ भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंनी आंदोलन केले होते. संपूर्ण देशभरात या आंदोलनाची दखल घेतली गेली. या आंदोलनामुळे ब्रिजभूषण सिंह यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेचे तिकीट नाकारण्यात आले. तसेच कुस्ती महा संघातूनही त्यांना बाहेर पडावे लागले होते. मात्र त्यांच्याविरोधातील आंदोलन भाजपाच्याच नेत्या असलेल्या माजी कुस्तीपटू बबिता फोगट यांच्या सांगण्यावरून झाल्याचा दावा ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने केला आहे. ब्रिजभूषण सिंह यांना बाजूला करून बबिता फोगटला कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व्हायचे होते, असाही दावा साक्षी मलिकने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साक्षी मलिकने आपल्या ‘विटनेस’ या पुस्तकात कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत स्वतःचे मत मांडले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने तिने इंडिया टीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विनेश फोगटवर आरोप केला. मलिकने सांगितले की, बबिता फोगटने कुस्तीपटूंची बैठक घेतली होती आणि त्यांना ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गैरव्यवहार आणि विनयभंगाचे आरोप करण्यास सांगितले होते.

हे वाचा >> बजरंग, विनेशची चळवळ स्वार्थी वाटली : साक्षी मलिक

बबिता फोगटला अध्यक्षपद हवे होते

“बबिता फोगटने आमच्याकडे आली आणि तिने आम्हाला आंदोलन करण्यास सांगितले. कारण ब्रिजभूषण यांच्याविरोधात तिचा वैयक्तिक अजेंडा होता. तिला भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद मिळवायचे होते. काँग्रेसने आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, अशी अफवा होती. पण हे असत्य आहे. उलट भाजपाच्याच दोन नेत्यांनी आम्हाला हरियाणामध्ये आंदोलन करायची परवानगी मिळवून दिली होती. त्यात बबिता फोगट आणि तीर्थ राणा यांचा समावेश होता.

साक्षी मलिक पुढे म्हणाली, “आम्ही बबिता फोगटचे आंधळेपणाने अनुकरण केले असे नाही. कारण महासंघात विनयभंग आणि छळवणुकीचे प्रकार खरोखरच घडले होते. आम्हाला वाटले की, कुस्ती महासंघाला एखादी महिला अध्यक्ष त्यातही बबिता फोगट सारखी खेळाडू प्रमुख म्हणून लाभली तर सकारात्मक बदल होऊ शकतील. तिला आमचा संघर्ष समजू शकतो, अशी आमची अपेक्षा होती. पण ती आमच्याबरोबरच एवढा मोठा खेळ खेळेल, याची मात्र आम्हाला कल्पना नव्हती.”

“आम्हाला वाटले की, तीही आमच्याबरोबर आंदोलनाला बसेल आणि अन्याय-छळवणुकीच्या विरोधात आवाज उचलेल. पण तसे झाले नाही”, अशीही टीका साक्षी मलिकने केली.

वैयक्तिक आयुष्यातील घटनांवरही भाष्य

साक्षीने पुस्तकातून वैयक्तिक आयुष्यावरही टिप्पणी करताना कारकीर्दीमधील बहुतेक पुरस्कार रक्कम माझ्या कुटुंबीयांनी काढून घेतली आहे, असे लिहिले आहे. कुटुंबीयांचा मी सत्यव्रत काडियानशी विवाह करण्यासही विरोध होता. मात्र, मी ठाम भूमिका घेतली आणि सत्यव्रतशीच नाते जोडले, असेही साक्षीने म्हटले आहे.