दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात येण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या भिंतीवर वादग्रस्त घोषणा लिहिल्याचे प्रकरण समोर आले आहे. “बाबरी मशीद पुन्हा बांधली जाईल” अशा आशयाचा मजकूर विद्यापीठातील भाषा अभ्यास केंद्राच्या भिंतीवर लिहिण्यात आला होता. बाजूला भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटन अर्थात एनएसयूआय या काँग्रेसच्या संघटनेचेही नाव लिहिण्यात आले होते. खाली ६ डिसेंबर तारीख लिहिण्यात आली होती. या घोषणा नजरेस आल्यानंतर विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ भिंतीवरील मजकूर पुसून टाकण्यासाठी भिंत रंगविली.
बाबरीची घोषणा लिहिल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने सर्वच भिंतीवरील घोषणा, भित्तिचित्र हटविण्याचे आदेश दिले आहेत. जेएनयू संकुलात सावधानतेचा इशारा देण्यात आला असून सदर प्रकार वारंवार होत असल्यामुळे याचा तपास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागाना सुरक्षा व्यवस्था वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे वाचा >> जेएनयूच्या आवारात प्रथमच रा. स्व. संघाचे पथसंचलन; विद्यार्थी संघटनांची कारवाईची मागणी
सात दिवसांत अहवाल देण्याचे आदेश
विद्यापीठ प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, तपास करणाऱ्या समितीला विद्यापीठाच्या सर्व विभागाशी संपर्क करण्यास सांगितले आहे. तसेच त्या त्या विभागाच्या डिनशी चर्चा करून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत चाचपणी करण्यासही सांगितले आहे. तपासाचा अहवाल एका आठवड्यात सुपूर्द करावा, असे निर्देश समितीला दिले आहेत.
आणखी वाचा >> अन्वयार्थ : ही तर धोक्याची घंटा..
एनएसयूआयने हात झटकले
एनएसयूआय संघटनेचे जेएनयू अध्यक्ष सुधांशू शेखर यांनी म्हटले की, सदर भिंतीवर आमच्या संघटनेचे नाव काळ्या शाईमध्ये आधीपासूनच लिहिलेले होते. त्यावर कुणीतीरी लाल शाईचा वापर करून सदर वादग्रस्त घोषणा लिहिली आहे. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नसून वादग्रस्त घोषणा लिहिणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. मात्र जेएनयू प्रशासन या प्रकरणात अधिक चौकशी करत नाही.