पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असतानाच एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बाबरी मशिदीसंदर्भात एक ट्विट केलं आहे. ओवेसी यांनी बाबरी मशिदीचे दोन फोटो ट्विट केले असून, बाबरी जिंदा है असं म्हटलं आहे. कालच ओवेसींनी बाबरी मशीद प्रकरणावरुन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सुनावलं होतं. त्यानंतर आज भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या दिवशीच ओवेसींनी सकाळीच ट्विटवरुन बाबरीचे दोन फोटो ट्विट केले आहेत.

“बाबरी मशीद होती, आहे आणि राहणार इन्शाअल्लाह”, असं ट्विट ओवेसींनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बाबरीच्या एका जुन्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फोटोबरोबरच रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान बाबरी मशिदीची वास्तू पाडण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोनादरम्यानचाही फोटो ट्विट केला आहे.

ओवेसी यांनी #BabriZindaHai हा हॅशटॅग वापरल्यानंतर तो टॉप ट्रेण्डमध्ये आला आहे. अनेकांनी बाबरीसंदर्भातील ट्विट केलं असून ओवेसींचे ट्विटही चांगलेच व्हायरल झाल्याचे पहायाला मिळत आहे. मात्र राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर ओवेसींनी अशाप्रकारे पहिल्यांदाच वक्तव्य केलेलं नाही. यापूर्वीही त्यांनी मागील काही दिवसांमध्ये बाबरीसंदर्भातील वक्तव्य केली आहेत. प्रियंका गांधी यांनी मंगळवारी (४ ऑगस्ट २०२० रोजी) ट्विटरवरुन राम मंदिराच्या भूमिपूजनासंदर्भात एक पत्रक ट्विटवरुन पोस्ट केलं. यामध्ये त्यांनी प्रभू रामचंद्र आणि सिता मातेचे मंदिर उभारले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. प्रियंका यांच्या याच ट्विटवरुन ओवेसी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “आनंद आहे की ते (काँग्रेस) आता दिखावा करत नाहीय. जर त्यांना प्रखर हिंदुत्वावाद्यांची बाजू घ्याची असेल तर आमची काहीच हरकत नाही. मात्र ते करताना ही बंधुभावासंदर्भातील उथळ वक्तव्य का करावीत? (तुम्ही) लाजू नका, कृपया आमची बाबरी मशीद पाडण्यामध्ये तुमच्या पक्षाने जी भूमिका बजावली त्याचा अभिमान बाळगा,” असं ओवेसी यांनी प्रियंका यांच्या ट्विटवर प्रितिक्रिया देताना म्हटलं.

मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची घोषणा आठवड्याभरापूर्वी करण्यात आली त्यावेळीही ओवेसी यांनी पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावणे हे संविधानाच्या शपथेच्या विरोधात असल्याची टीका केली होती. “पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे संविधानाच्या शपथेच्या विरोधातील आहे. धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा महत्त्वाचा भाग आहे. अयोध्येत ४०० वर्षांपर्यंत बाबरी मशीद उभी होती. परंतु काही गुन्हेगारांच्या गटानं १९९२ मध्ये ती पाडली हे आम्ही विसरणार नाही,” असं ओवेसी म्हणाले होते.

भूमिपूजन सोहळ्याच्या तयारीसंदर्भातील एका चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या ओवेसी यांनी काही दिवसांपूर्वीच मी जिवंत असेपर्यंत अयोध्या हा मुद्दा सोडणार नाही असंही म्हटलं होतं “कायदेशीरदृष्ट्या सर्वात वर असलेल्या सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. परंतु, मी जिवंत असेपर्यंत हा मुद्दा बंद होणार नाही. मी माझ्या कुटुंबाला, माझ्या लोकांना आणि भारतातील लोकांनाही, ज्या बहुसंख्य लोकांचा न्यायावर विश्वास आहे. त्यांना सांगेल की, तिथे एक मशीद होती. ६ डिसेंबर १९९२ रोजी ती पाडली गेली. जर मशीद पाडली गेली नसती, तर हा कार्यक्रम (राम मंदिर भूमिपूजन) आयोजित करताच आला नसता,” अशी टीका ओवेसी यांनी केली होती.