Aligarh Babu Arrest in Pakistan: प्रेमासाठी समाजाच्या, देशाच्या, नैतिकतेच्या सीमा ओलांडून आजवर अनेकजण गेले आहेत. भारतात आलेली सीमा हैदर सर्वांना परिचित आहे. त्याप्रमाणेच भारतातूनही काही जण शेजारच्या देशात जातात. उत्तर प्रदेशमधील अलीगढ जिल्ह्यातील एक प्रकरण आता समोर आले आहे. येथील ३० वर्षीय बादल बाबूने फेसबुकवरील महिलेच्या प्रेमात भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला. मात्र आता त्याची रवानगी पाकिस्तानच्या तुरुंगात करण्यात आली आहे. २७ डिसेंबर रोजी पाकिस्तानात अवैधरित्या कोणत्याही कागदपत्रांशिवाय प्रवेश केल्यामुळे मंडी बहूद्दीन शहर पोलिसांनी त्याला अटक केली.
फेसबुकवर चॅटिंग करत असलेल्या महिलेला भेटण्यासाठीच आपण सीमा ओलांडून आलो असल्याचे बाबूने पोलिसांच्या चौकशीत मान्य केले. सीमा ओलांडण्याचे हे एकमेव कारण असल्याचे त्याने सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, बाबूने म्हटले की, गेल्या काही वर्षांपासून तो फेसबुकवर एका महिलेशी चॅटिंग करत होता. तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर तिला भेटण्याच्या तळमळीतून पाकिस्तानात प्रवेश केला.
बाबूकडे पासपोर्ट आणि कागदपत्रे नसतानाही त्याने याआधी दोन वेळा पाकिस्तानात प्रवेश करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. पण तिसऱ्या प्रयत्नात तो पाकिस्तानात पोहोचला. मात्र त्याचे हे प्रेमप्रकरण आता त्याला चांगलेच महागात पडले आहे. पाकिस्तान परदेश कायदा, १९४६ च्या कलम १३ आणि १४ नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता पुढील सुनावणी १० जानेवारी २०२५ रोजी होणार आहे.
बाबूच्या कुटुंबियांना धक्का
बाबू कुटुंबियांच्या नकळत पाकिस्तानात पोहोचल्याचे समजल्यानंतर कुटुंबियांना मात्र धक्का बसला आहे. बाबूचे वडील कृपाल सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ३० नोव्हेंबर रोजी आम्ही व्हिडीओ कॉलवर शेवटचे बोललो होतो. तो त्याच्या एका कामासाठी लांबच्या प्रवासाला जाणार असल्याचे म्हणाला होता. तेव्हापासून कुटुंबियांचा बाबूशी कोणताही संपर्क झाला नाही. मात्र त्याच्या अटकेची बातमी माध्यमांत आल्यानंतर कुटुंबाला धक्काच बसला. आता त्यांनी बाबूच्या सुटकेसाठी भारत सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा >> पाकिस्तानात तरुणीनं आपल्याच कुटुंबातील १३ जणांची केली हत्या; प्रियकराशी लग्नास दिला होता नकार!
अलीगढच्या स्थानिक पोलिसांनी सांगितले की, पाकिस्तान किंवा भारतीय परराष्ट्र विभागाकडून बाबूच्या अटकेबाबतचा अधिकृत निरोप आलेला नाही. अलीगढचे पोलीस अधीक्षक संजीव सुमन यांनी सदरच्या वृत्ताला दुजोरा दिला असून पुढील तपास सुरू केला असल्याचे ते म्हणाले.