माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. बाबुल सुप्रियो लोकसभेचे खासदार होते. यावेळी त्यांनी भाजपा सोडताना आपल्याला खूप वाईट वाटल्याचं म्हटलं आहे. बाबुल सुप्रिया यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणात संधी दिल्याबद्दल तसंच पक्षात महत्त्वाच्या भूमिका दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.

“भाजपासोबत राजकीय करिअरला सुरुवात केल्याने मी भावूक झालो आहे. मी पंतप्रधान, भाजपाध्यक्ष आणि अमित शाह यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला,” असं बाबुल सुप्रियो म्हणाले आहेत. बाबुल सुप्रियो यांनी गेल्या महिन्यात भाजपाला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याने खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. “मी पूर्णपणे राजकारण सोडत आहे. जर मी पक्षाचा भाग नसेन तर ही जागा ठेवणं योग्य नाही असा विचार मी केला,” असं बाबुल सुप्रियोंनी सांगितलं.

बाबुल सुप्रियो यांना जुलै महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बदलांमध्ये वगळण्यात आलं होतं. त्यांनी पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री म्हणून काम केलं होतं. यानंतर ३१ जुलैला त्यांनी फेसबुक पोस्ट करत राजीनामा जाहीर केला होता. यावेळी त्यांनी आपण कोणत्याही दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार नसल्याचंही सांगितलं होतं. मात्र नंतर त्यांनी तो भाग डिलीट केला होता.

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी दिलेल्या ऑफरमुळेच आपण भाजपा सोडत राजकारणातील नव्या करिअरला सुरुवात केल्याचं बाबुल सुप्रियो यांनी सांगितलं आहे. १८ सप्टेंबरला बाबुल सुप्रियो यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पश्चिम बंगालच्या जनतेची सेवा करण्याची संधी पुन्हा मिळाल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं होतं.