पश्चिम बंगालमध्ये काहीच दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी खासदार बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, आता भाजपाला रामराम ठोकल्यानंतर बाबुल सुप्रियो यांनी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान मोदींचा बंगाली लोकांवर विश्वास नाही. ते बंगालमधील लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध जोडण्यास अपयशी ठरले आहेत”, अशी टीका बाबुल सुप्रियो यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर केली आहे.

“मी दीदींच्या नेतृत्त्वाखाली…”

“दिल्लीतील माझ्या सात ते आठ वर्षांच्या कारकिर्दीत मला कळलं आहे की, पंतप्रधान मोदींचा एकतर बंगाली लोकांवर विश्वास नाही किंवा ते कुठेतरी त्यांच्याशी सुसंवाद साधण्यात, सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यात अपयशी ठरले आहेत”, असं बाबुल सुप्रियो म्हणाले. “मी दीदींच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी बंगालच्या लोकांची सेवा करण्यासाठी आलो आहे”, असंही बाबुल सुप्रियो म्हणाले.

…तेव्हा पंतप्रधानांवर टिपण्णी करण्यास नकार

बाबुल सुप्रियो यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजपाला रामराम ठोकून टीएमसीमध्ये प्रवेश केल्यानंतर सुप्रियो यांना पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्व शैलीवर प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. परंतु, त्यावेळी त्यांनी पंतप्रधानांबद्दल टिप्पणी करण्यास नकार दिला होता.दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश करताना बाबुल सुप्रियो म्हणाले होते की, “पंतप्रधान मोदींनी मला राजकारणात येण्यासाठी प्रेरित केलं आहे.”

राजकारणातून निवृत्तीची घोषणा

पुढे बाबुल सुप्रियो यांना मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री करण्यात आलं होतं. मात्र, अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर सुप्रियो यांनी भाजपा सोडल्याचं जाहीर केलं. इतकंच नव्हे तर राजकारणातून निवृत्तीची घोषणाही केली होती. “गुडबाय…. मी कोणत्याही राजकीय पक्षात जात नाही. टीएमसी, काँग्रेस, सीपीआय(एम) कोणीही मला बोलावलेलं नाही, मी कुठेही जाणार नाही. समजाकार्य करण्यासाठी राजकारणातच असण्याची गरज नाही,” असं त्यावेळी सुप्रियो यांनी म्हटलं होतं.

Story img Loader