पूर्वपरवानगीशिवाय सुटी लांबवणाऱया किंवा कामानंतर एक महिन्यापेक्षा जास्त काळ परदेशात थांबणाऱया आयएएस किंवा आयपीएस दर्जाच्या सनदी अधिकाऱयांवर त्यांची नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते. केंद्र सरकारने यासंदर्भात नवी नियमावली जारी केली असून, त्यानुसार कामानिमित्त परदेशात गेलेल्या सनदी अधिकाऱयांवर अधिक बंधने टाकण्यात आली आहेत.
कामानिमित्त परदेशात गेलेले काही अधिकारी काम पूर्ण झाल्यावरही पुन्हा देशात परतत नाहीत. त्याचवेळी काही अधिकारी वरिष्ठांना कोणतीही पूर्वसूचना न देता परदेशामध्ये राहून रजेवर जातात. या सगळ्याचा विचार करून कार्मिक मंत्रालयाने सनदी अधिकाऱयांबाबत नवी नियमावली तयार केली. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय वनसेवा, भारतीय पोलीस सेवा या व इतर भारतीय स्तरावरील सेवांमधील अधिकारी मंजूर केलेल्या सुटीपेक्षा जास्त काळ विनापरवानगी गैरहजर राहिल्यास, परदेशातील काम संपल्यावर तेथून वेळेत परत न आल्यास एक महिन्यापर्यंत वाट पाहण्यात येईल. त्यानंतर संबंधित अधिकारी ज्या केडरमधून आला असेल तेथून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. या नोटिसीला जर संबंधित अधिकाऱयाने उत्तर दिले नाही. तर राज्य सरकार त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करेल आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले. त्यानंतर दोन महिन्यात त्याला कामावरून कमी केले जाईल. जर राज्य सरकारने ही कारवाई केली नाही, तर केंद्र सरकार स्वतःहून संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करू शकेल, असेही या नियमावलीत स्पष्ट केले आहे.

Story img Loader