गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये जेवढी चर्चा शिवसेनेच्या एंट्रीची झाली, त्याहून जास्त चर्चा उत्पल पर्रीकरांचं कापलेलं तिकीट, त्यांचा राजीनामा आणि बाबूश मॉन्सेरात यांना मिळालेली भाजपाचे उमेदवारी याची झाली. उत्पल पर्रीकरांना नाकारून तिकीट आपल्याला दिल्याचा निर्णय सार्थकी लावत बाबूश मॉन्सेरात यांनी भाजपाला विजय मिळवून दिला आहे. ८०० हून जास्त मतांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उत्पल पर्रीकरांचा पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर बाबूश मॉन्सेरात यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना त्यांनी मात्र भाजपावर आणि पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर तोंडसुख घेतलं आहे.
उत्पल पर्रीकरांनी भाजपामध्ये असताना आपल्या वडिलांच्या अर्थात मनोहर पर्रीकरांच्या पारंपरिक पणजी मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र, भाजपाने इतर मतदारसंघांची निवड करण्याचं आवाहन त्यांना केल्यानंतर उत्पल पर्रीकरांनी भाजपाला रामराम ठोकत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. पणजीमधून भाजपानं बाबूश मॉन्सेरात यांना उमेदवारी दिली. बाबूश मॉन्सेरात यांनी अवघ्या ८०० मतांनी ही निवडणूक जिंकली असताना उत्पल पर्रीकरांनी त्यांना कडवी झुंज दिल्याचं बोललं जात आहे.
“कार्यकर्त्यांच्या जोरावरच जिंकलो”
दरम्यान, यावर बोलताना बाबूश मॉन्सेरात यांनी आपण भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या जोरावरच जिंकल्याचं म्हटलं आहे. “मी भाजपाचा अनधिकृत उमेदवार म्हणून लढलो. दोन्ही बाजूच्या काही कार्यकर्त्यांच्या जोरावरच आम्ही निवडणूक जिंकू शकलो”, असं बाबूश मॉन्सेरात विजयानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले.
भाजपा केडरनं मला स्वीकारलंच नाही
यावेळी बोलताना बाबूश मॉन्सेरात यांनी भाजपावरच तोंडसुख घेतलं आहे. “मला वाटतं की भाजपा केडरनं मला पक्षात स्वीकारलेलंच नाही. मी याकडे त्या दृष्टीने पाहातो. जर उत्पल पर्रीकरांना इतकी मतं मिळत असतील, तर ती फक्त भाजपा केडरनं आपली मतं त्यांच्याकडे वळवल्यामुळेच मिळाली. मी फक्त हेच बघू शकतो. भाजपा पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला डॅमेज कंट्रोल करण्यात अपयश आलं”, असं ते म्हणाले.
भाजपाच्या नेत्या काँग्रेसच्या टेबलवर?
दरम्यान, बाबूश मॉन्सेरात यांनी भाजपाच्या महिला नेत्या काँग्रेसच्या टेबलवर बसल्याचा दावा केला आहे. “तळेगावमध्ये पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा झळकला आहे. तिथल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देखील जेनिफरच्या विरोधात काम केलं. भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा निवडणुकीच्या दिवशी काँग्रेसच्या टेबलवर बसल्या होत्या”, असं ते म्हणाले.