Newborn Baby Declared Death: आसाममधील सिलचरमधील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केलेले नवजात अर्भक बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यापूर्वी जिवंत असल्याचे आढळून आले. या धक्कादायक घटनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नवजात मुलाचे वडील रतन दास म्हणाले की त्यांनी आपल्या सहा महिन्यांच्या गर्भवती पत्नीला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना ‘गुंतागुंत झाल्यामुळे’ फक्त आई किंवा बाळाला वाचवणे शक्य होईल असे सांगितले होते. अशावेळी आईचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले पण बाळाला मृत घोषित करण्यात आले होते. मात्र काहीच त्रासात चमत्कार घडल्याप्रमाणे घटनांनी वेगळेच वळण घेतले, नेमका हा घटनाक्रम काय होता हे पाहूया…
नवजात मुलाचे वडील रतन दास यांनी सांगितले की, “मी मंगळवारी संध्याकाळी माझ्या सहा महिन्यांच्या गरोदर पत्नीला सिलचरमधील एका खाजगी रुग्णालयात नेले जेथे डॉक्टरांनी सांगितले की काही गुंतागुंत असल्याने आणि ते आई किंवा बाळाला वाचवू शकतात. आम्ही त्यांना प्रसूती करण्याची परवानगी दिली आणि त्यांनी सांगितले की माझ्या पत्नीने एका मृत मुलाला जन्म दिला आहे. बुधवारी सकाळी आम्हाला बाळाचा मृतदेह ताब्यात मिळाला.”
दास व कुटुंबाला एका पॅकेटमध्ये बाळाचा मृतदेह मिळाला होता ज्याला घेऊन कुटुंब स्मशानभूमीत पोहोचले. सिलचर स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर, अंतिम संस्कारापूर्वी जेव्हा दास यांनी पॅकेट उघडले तेव्हा बाळाच्या रडण्याचा आवाज आला. साहजिकच यामुळे कुटुंब पूर्णतः हादरून गेले होते पण त्या धक्क्यातून सावरत बाळाला घेऊन दास हे रुग्णालयात पोहोचले आणि आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा<< मुंबईत धावत्या बेस्ट बसला लटकून तरुणांचा प्रवास; Video पाहून आधी दया येईल पण खरं जाणून व्हाल संतप्त
दरम्यान, या घटनेनंतर सिलचरच्या मालिनीबिल भागातील लोकांचा एक गट खाजगी रुग्णालयासमोर जमा झाला होता आणि इथे रुग्णालय प्राधिकरणाविरोधात निदर्शने सुरु झाली. कुटुंबीयांनी सुद्धा रुग्णालय आणि डॉक्टरांवर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. दुसरीकडे, रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी बाळाला मृत घोषित करण्यापूर्वी आठ तास निरीक्षणाखाली ठेवले होते असे सांगितले आहे.