एका धक्कादायक घटनेत दोन महिन्याची मुलगी मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये मृतावस्थेत आढळली आहे. सोमवारी दक्षिण दिल्लीतील चिराग दिल्ली भागातून ही घटना उघडकीस आली. सोमवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास बाळाच्या मृत्यूची माहिती मिळाली आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसेच अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं बेनिता मेरी जायकर, पोलीस उपायुक्त दक्षिण यांनी सांगितलं.
दरम्यान, प्राथमिक तपासात या प्रकरणात मुख्य संशयित बाळाची आई आहे. कारण, मुलीच्या जन्मामुळे ती नाराज होती. मृत मुलीचा जन्म या वर्षी जानेवारीमध्ये झाला होता आणि तेव्हापासून डिंपल कौशिक नाराज होत्या. यावरून त्यांनी पतीशी भांडणही केले होते,” अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिली आहे.
एका शेजाऱ्याने बाळाच्या मृत्यूबद्दल पोलिसांना माहिती दिली. तसेच यावेळी “डिंपल कौशिक यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले होते, त्यानंतर त्यांच्या सासूने आरडाओरड केली नंतर आम्ही काच फोडली आणि खोलीत प्रवेश केला. तेव्हा आम्हाला त्या त्यांच्या चार वर्षांच्या मुलासह बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली, परंतु दोन महिन्याची मुलगी बेपत्ता होती, त्यानंतर तिचा शोध घेतला असता ती मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये आढळली. तर महिलेचा पती ही घटना घडली त्यावेळी घरी नव्हता,” असं शेजाऱ्याने सांगितलं.
“बाळाचे पालक, गुलशन कौशिक आणि डिंपल कौशिक यांची पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली जात आहे आणि पुढील तपास सुरू आहे,” असं जयकर म्हणाल्या.