अर्थशास्त्राच्या विश्वात ‘बेबी नोबेल’ या नावाने प्रसिद्ध असलेले जॉन बेटस् क्लार्क पदक पटकाविण्याचा मान यंदा भारतीय युवकाने मिळवला आहे. राज चेट्टी असे त्यांचे नाव असून हॉर्वर्ड विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात गेली तीन वर्षे ते अध्यापन करीत आहे.
अर्थशास्त्राच्या क्षेत्रात मूलभूतपणे नवीन संकल्पना मांडणाऱ्या तसेच या क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या मात्र, ४० वर्षांपेक्षा लहान असलेल्या व्यक्तीला जॉन बेटस् क्लार्क हे पदक देण्यात येते. स्वाभाविकच या पुरस्काराकडे ‘बेबी नोबेल’ पुरस्कार म्हणून पाहिले जाते. यावर्षी हा मान दिल्लीमध्ये जन्मलेल्या राज चेट्टी यांना मिळाला. असा मान मिळवणारे ३३ वर्षीय चेट्टी हे भारतीय वंशाचे पहिले अर्थतज्ज्ञ ठरले आहेत.
करप्रणाली, सामाजिक विमा धोरण आणि शैक्षणिक धोरणाबाबत चेट्टी यांनी अत्यंत मूलभूत स्वरूपाचे संशोधन केले असल्याचे अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन ऑनर्स अँड अ‍ॅवॉर्ड कमिटीने म्हटले आहे.
यापूर्वी हे मानाचे पदक पटकाविण्याचा मान पॉल क्रुगमन, जोसेफ स्टीगलिटझ्, मिल्टन फ्राईडमन, पॉल सॅम्युअलसन् आदी नोबेल पारितोषिक विजेत्यांनी आपल्या तारुण्यात मिळवला होता.

Story img Loader