खलिस्तानी दहशतवादी देवेंद्रपाल सिंग भुल्लर याला ठोठावण्यात आलेल्या फाशीची शिक्षा रद्द करावी या मागणीसाठी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी सोमवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. भुल्लर याच्याबाबत पंजाबमधील जनतेच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे त्याला फाशी दिल्यास परिस्थिती चिघळून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती बादल यांनी व्यक्त केली आहे.
भुल्लरप्रकरणी पंतप्रधानांनी योग्य तोडगा सुचवावा. जेणेकरून त्याला शिक्षेत सवलत मिळेल, अशी विनंती पंतप्रधानांना केल्याची माहिती मुख्यमंत्री बादल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अनेक चुकीच्या निर्णयामुळे देशाचे किती नुकसान झाले आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे राज्याच्या तसेच देशाच्या हितासाठी भुल्लरच्या शिक्षेबाबत सहानुभूतीने विचार करण्याची गरज असल्याचे बादल यांनी सांगितले. भुल्लरप्रकरणी मुख्यमंत्री बादल आणि त्यांचा मुलगा उपमुख्यमंत्री सुखबिर सिंग बादल यांनी शिरोमणी अकाली दलाच्यावतीने पंतप्रधानांना याबाबतचे निवेदन दिले. त्यावर बादल यांनी दिलेल्या निवेदनाचा सरकार सर्वबाजूनी विचार करीत असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिली.  मुख्यमंत्री बादल यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचीही भेट घेऊन याप्रकरणी राज्याच्या हितासाठी लक्ष घालण्याचे आवाहन केले. तर गृहमंत्री शिंदे यांनीही याप्रकरणी योग्य तो तपास करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे उपमुख्यमंत्री सुखबिर सिंग बादल यांनी सांगितले.

Story img Loader