Badlapur Sexual Assault Mahua Moitra Compares Kolkata RG Kar case : बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर या शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर (वय चार वर्षे व सहा वर्षे) लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कायक घटना (Badlapur Sexual Assault) १२ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी कारवाई करण्यास उशीर करणाऱ्या शाळेविरोधात आणि गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलीस प्रशासनाविरोधात बदलापूरकरांनी मंगळवारी (२० ऑगस्ट) मोठं आंदोलन उभं केलं. त्यानंतर सरकार व पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या दिरंगाईमुळे पोलीस व राज्य सरकारवर टीका होऊ लागली आहे. राज्यातील विरोधी पक्ष (महाविकास आघाडी) सरकारविरोधात आक्रमक झालेले असतानाच तृणमूल काँग्रेसनेही राज्य सरकारच्या कारभारावर बोट ठेवलं आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झालेल्या बलात्कार व हत्याकांड प्रकरणी कोलकाता पोलिसांनी केलेली कारवाई व महाराष्ट्रात बदलापूरमधील घटनेनंतर (Badlapur Sexual Assault) पोलिसांनी केलेल्या कारवाईची तुलना केली आहे. मोइत्रा म्हणाल्या, “आर. जी. कर रुग्णालयातील घटनेची माहिती मिळताच कोलकाता पोलिसांनी तातडीने घटनेचा पंचनामा केला, शवविच्छेदन करून त्याचं चित्रीकरणही केलं. त्याचबरोबर काही तासांत आरोपीला अटक केली. परंतु, महाराष्ट्रात मात्र विपरीत गोष्ट पाहायला मिळाली. पोलिसांनी अनेक दिवस गुन्हा दाखल केला नव्हता. ही खऱ्या अर्थाने लोकशाहीविरोधी आघाडी (Non Democratic Alliance) आहे”.
कोलकाता प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी देशभरातील डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर
बदलापूरची घटना घडण्याआधी कोलकात्यातही अशाच प्रकारची घटना समोर आली होती. येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर देशभरातील निवासी डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. देशभरातील डॉक्टरांच्या संघटना आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी, डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. काही डॉक्टरांनी थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे.
हे ही वाचा >> Badlapur Sexual Assault : बदलापूर प्रकरणानंतर शक्ती कायद्याची मागणी, राज्य सरकारची भूमिका काय? अजित पवार म्हणाले…
बदलापूर प्रकरणात पोलिसांची दिरंगाई
बदलापूरमधील घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याचं नुकतंच समोर आलं आहे. पीडित चिमुकल्यांच्या पालकांना पोलिसांनी तब्बल ११ तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं होतं. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिलं नाही. मुलींचे पालक १६ ऑगस्ट रोजी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. पीडित मुलीची आई गरोदर होती त्यानंतरही त्या महिलेला तब्बल ११ तास पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी बसून राहावं लागलं. त्यात गुन्हा दाखल करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महिला बालहक्क आयोगाच्या सदस्यांना पाचरण करावे लागले. त्यानंतर दबाव वाढल्याने पोलिसांनी मध्यरात्री दहाच्या सुमारास गुन्हा दाखल केला.