बद्रीनाथ : वैदिक मंत्रोच्चाराच्या घोषात आणि पारंपरिक धार्मिक विधींच्या साथीने बद्रीनाथ मंदिराची कवाडे रविवारी सकाळी सव्वासहा वाजता भाविकांसाठी उघडण्यात आली.

भगवान विष्णूचे हे मंदिर उघडण्याचा समारंभ पाहण्यासाठी देश-विदेशातील हजारो भाविक उपस्थित होते. मुख्य पुजारी ईश्वरीप्रसाद नंबुद्री यांनी धार्मिक विधी केले, तर वेदपाठींनी स्तोत्रे म्हटली. या प्रसंगासाठी मंदिर व त्याचा परिसर झेंडूच्या फुलांनी सुशोभित करण्यात आला होता.

चारधाम यात्रेतील इतर तीन मंदिरे भाविकांसाठी यापूर्वीच खुली झाली आहेत. बद्रीनाथ मंदिराची दारे उघडल्यामुळे चारधाम यात्रा पूर्णपणे सुरू झाली आहे. गंगोत्री व यमुनोत्री ३ मे रोजी, तर केदारनाथ मंदिर ६ मे रोजी खुले झाले होते.

गेली दोन वर्षे करोना महासाथीचा चारधाम यात्रेला फटका बसल्यामुळे भाविकांसाठी मंदिराची दारे उघडण्यास मोठा विलंब झाला होता. हा विलंब आणि करोनामुळे भाविकांवर लादण्यात आलेले निर्बंध यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावली होती. दोन वर्षांच्या खंडानंतर ही यात्रा करोनाविषयक निर्बंधांशिवाय होत असून यात्रेकरू उत्साहात आहेत. मंदिरात प्रार्थना करण्याची आपली पाळी येण्याची वाट पाहात भाविकांनी शनिवारी उशिरा रात्रीच रांगेत उभे राहण्यास सुरुवात केली होती.

Story img Loader