Bageshwar Baba Dhirendra Krishna Shastri : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री हे सध्या बिहारमध्ये आहेत. बिहारमध्ये सध्या त्यांची हनुमान कथेची पारायणं चालू आहेत. या कथावाचनाच्या कार्यक्रमांना काही लोकांकडून विरोध होत आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांच्या कथावाचनाच्या कार्यक्रमांना होत असलेल्या विरोधावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ज्यांना रामाच्या नावाची अडचण आहे तेच लोक या कार्यक्रमाला विरोध करत आहेत. मात्र, याचा अर्थ असा नाही की आम्ही हा विरोध पाहून आमचं काम थांबवू. आमचं काम चालूच राहील. राष्ट्रीय जनता दलचे आमदार खालिद अन्वर आणि पूर्णियाचे खासदार पप्पू यादव या कथावाचनाच्या कार्यक्रमाला विरोध करत आहेत.”

बागेश्वर धामच्या वतीने बिहारच्या गोपालगंजमधील हुस्सेपूर गावातील रामनगर मठात या हनुमान कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला होत असलेल्या विरोधाबद्दल ‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी बातचीत करताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार। ज्यांना भुंकायचं आहे त्यांनी खुशाल भुंकत बसावं, आम्हाला त्यांच्या भुंकण्याने काहीच फरक पडणार नाही.”

धीरेंद्र शास्त्रींची मोठी घोषणा

दरम्यान, रामनगर मठातील कथावाचनाच्या कार्यक्रमावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले, “मी लवकरच देशभर पदयात्रा करणार आहे. उत्तर प्रदेशमधून या यात्रेची सुरुवात होईल. यूपीपाठोपाठ आमची यात्रा बिहारमध्ये दाखल होईल. ही केवळ साधीसुधी यात्रा नसेल. या यात्रेद्वारे हिंदू समाजातील लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. ती यात्रा हिंदू एकतेचं प्रतीक असेल. हिंदू राष्ट्राच्या दिशेने पुढे सरसावण्यासाठी समाज संघटित होणं गरजेचं आहे. त्यासाठीच आम्ही हे सगळे प्रयत्न करत आहोत.

बिहारपासून हिंदू राष्ट्राचं बिगूल वाजेल : धीरेंद्र शास्त्री

बिहारपासून हिंदू राष्ट्राच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होईल, असं म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा अखंड भारताचा नारा दिला. आम्हाला अखंड भारत हवा आहे, असं ते म्हणाले.

धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “बिहारपासून हिंदू राष्ट्राचं बिगूल वाजेल. यावेळी कागदावर नव्हे तर हिंदूंच्या हृदयात हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. जेणेकरून सनातन, संत व हिंदूंकडे कोणीही बोट दाखवू नये. हिंदूंची मंदिरं सुरक्षित राहायला हवीत. मंदिरं कोणीही तोडू नयेत, हिंदूंचं जातीजातीत विभाजन होऊ नये यासाठी हिंदू राष्ट्राची आवश्यकता आहे.”

Story img Loader