Bageshwar Baba On Meerut Murder Case: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडलेल्या हत्याकांडामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मर्चंट नेव्हीतील अधिकारी सौरभ राजपूत यांची, पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी हत्या केल्याचा आरोप आहे. पत्नी मुस्कान आणि तिच्या प्रियकाराने सौरभ राजपूत यांची छातीमध्ये वार करून हत्या केली होती. शवविच्छेदन अहवालानुसार, मृतदेहाचे १५ तुकडे करून ते प्लास्टिक ड्रममध्ये टाकून त्यावर सिमेंट काँक्रिट टाकण्यात आले होते. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.
बरं झालं माझं लग्न झालं नाही
दरम्यान या प्रकरणी आता बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली असून, “भारतात सध्या निळा ड्रम खूप प्रसिद्ध झाला आहे. खूप व्हायरल होत आहे आणि कित्येक पती दुःखात आहेत. देवाची कृपा आहे की माझं लग्न झालं नाही.”
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “मेरठ प्रकरण दुर्दैवी आहे. आज समाजात, ढासळणारी कुटुंब व्यवस्था, पाश्चात्य संस्कृतीचे आगमन आणि विवाहित पुरुष किंवा स्त्रिया प्रेमसंबंधात गुंतत असल्याने कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. यामध्ये संस्काराचा अभाव दिसत आहे. जर कोणाचा मुलगा किंवा मुलगी अशी कृत्ये करत असेल तर याचा अर्थ संगोपनामध्ये पालक कमी पडले आहेत, असा होतो. म्हणून, सुसंस्कृत कुटुंब निर्माण करण्यासाठी, प्रत्येक भारतीयाने श्री रामचरितमानसचा आधार घेणे आवश्यक आहे.”
काय आहे प्रकरण?
२८ वर्षीय मुस्कान रस्तोगीनं तिचा प्रियकर साहिल शुक्ला याच्याबरोबर मिळून ३ मार्चच्या रात्री पती सौरभ राजपूत याची हत्या केली होती. हत्येनंतर त्यांनी सौरभच्या मृतदेहाचे १५ तुकडे केले आणि प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकले. घडलेली घटना कुणालाही कळू नये म्हणून आरोपींनी ड्रममध्ये सिमेंटही भरलं, अशी माहिती मेरठ पोलिसांनी दिली होती.
या गुन्ह्याचा उलगडा होताच पोलिसांनी कटरच्या साह्यानं ड्रम कापून मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. याप्रकरणी मुस्कान आणि तिच्या प्रियकाराविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केलं असता दोघांनाही १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुस्कानच्या वडिलांनी केली फाशीची मागणी
“माझ्या मुलीने प्रियकराच्या साथीने नवऱ्याची हत्या केली आहे. ती या समाजात राहाण्यासाठी योग्य नाही आणि इतरांसाठीही धोकादायक आहे, तिला तत्काळ फासावर लटकवा”, असं मुस्कानच्या वडिलांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं.