Baghpat Laddu Festival Accident : उत्तर प्रदेशमधील बागपतमध्ये आज (२८ जानेवारी) एक मोठी दुर्घटना घडली आहे. बागपतमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात स्टेज कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७ जण ठार झाले आहेत, तर ४० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. तसेच ५० पेक्षा जास्त भाविक स्टेजखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर या ठिकाणी चेंगराचेंगरी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेत जखमी झालेल्या भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बागपत येथे मंगळवारी जैन निर्वाण उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले होते. यावेळी भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवात मनस्तंभ संकुलात तात्पुरतं उभारलेलं लाकडी व्यासपीठ अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला तर ४० पेक्षा जास्त जण जखमी झाले. या अचानक घडलेल्या दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
#WATCH | Uttar Pradesh: A watchtower collapsed during the 'Laddu Mahotsav' organized by the Jain community in Baghpat's Baraut city
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 28, 2025
Over 20 people got injured pic.twitter.com/HgyOqxwmMU
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान आदिनाथांना लाडू अर्पण करण्यासाठी आज सकाळी शेकडो भाविक या ठिकाणी आले होते. मात्र, अचानक ही दुर्घटना घडली. ही घटना घडल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केलं. त्यानंतर जखमी झालेल्या भाविकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच या घटनेची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली असून योग्य त्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी अस्मिता लाल यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, “बागपतमध्ये हा कार्यक्रम सुमारे ३० वर्षांपासून आयोजित केला जातो. यावेळीही आयोजित करण्यात आला होता. मात्र, अचानक लाकडी व्यासपीठ कोसळल्याने ही घटना घडली. यामध्ये ४० लोक जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच २० जणांना प्राथमिक उपचार दिल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. तसेच रुग्णवाहिका आणि तातडीने उपचारासाठी आरोग्य व्यवस्था देखील उपलब्ध करण्यात आली आहे”, असं अस्मिता लाल यांनी सांगितलं आहे.