ज्ञानवापी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या खटल्यांमध्ये हिंदू पक्षकारांना यश मिळालं आहे. यापाठोपाठ आता उत्तर प्रदेशमधील बागपत येथील बदरुद्दीन शाह मजार (कबर) आणि लाक्षागृह वादात न्यायालयाने हिंदू पक्षकारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. एडीजे न्यायालयाने (अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश) वादग्रस्त १०० बिघा (जवळपास पाच एकर) जमीन हिंदू पक्षकारांना दिली आहे. याप्रकरणी गेल्या ५० वर्षांपासून न्यायालयात खटला चालू होता. या खटल्यात न्यायमूर्तींनी अखेर हिंदू पक्षकारांच्या बाजूने निकाल दिला आहे.
१९७० मध्ये हे प्रकरण प्रकाशझोतात आलं होतं. मुकीम खान नावाच्या एका व्यक्तीने येथील लाक्षागृहास बदरुद्दीन शाह यांची कबर आणि कब्रस्तान (मुस्लीम समुदायाची स्मशानभूमी) म्हटलं होतं. मुस्लीम पक्षकारांनी या जागेवर दावा केला होता.
मुस्लीम समुदायाने या जागेवर दावा सांगितल्यानंतर हिंदू संघटनांनी देखील याप्रकरणी याचिका दाखल केली. १९७० नंतर अनेकवेळा या वादग्रस्त जमिनीवरून हिंदू आणि मुस्लीम संघटना आमने-सामने आल्या होत्या. या जमिनीच्या मालकी हक्काबाबत ५० वर्षांपासून न्यायालयात खटला चालू होता. गेल्या काही दशकांमध्ये हिंदू पक्षकारांनी या खटल्यात त्यांच्या बाजूने अनेक पुरावे सादर केले. हिंदूंनी दावा केला आहे की, महाभारत काळापासून या ठिकाणी लक्षागृह (लाखापंडप) अस्तित्वात आहे. या जागेचा पांडवांशी संबंध आहे.
येथील एका संस्कृत शाळेतील प्राचार्य आचार्य अरविंद कुमार शास्त्री यांनी याबाबत सांगितलं की, ही छोटी टेकडी महाभारत काळातील लाक्षागृह आहे. येथे पांडवकालीन बोगदादेखील आहे. याच बोगद्याचा वापर करून पांडव लाक्षागृहातून पळून गेले होते.”
या भागात मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचे इतिहासकार सांगतात. दुसऱ्या बाजूला, मुस्लीम पक्षकारांनी सांगितलं की, संबंधित जागेवर शेख बदरुद्दीन यांचा दर्गा आणि कब्रस्तान आहे. सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाकडे दर्गा आणि कब्रस्तानाची नोंद आहे.
भारतीय पुरातत्व विभागाने १९५२ मध्ये येथे उत्खनन केलं होतं. या उत्खननावेळी तिथे दुर्मिळ अवशेष सापडले होते. ४,५०० वर्षे जूनी भांडीदेखील सापडली होती. ही भांडी महाभारतकालीन असल्याचा दावा केला जातो.
लाक्षागृह काय आहे?
महाभारतातील कथेप्रमाणे दुर्योधनाने पांडवांविरुद्ध षडयंत्र रचून त्यांच्या निवाऱ्यासाठी वारणावत (बरनावा) येथे लाखेपासून एक महाल/मंडप उभारला होता. दुर्योधनाने हा महाल पेटवून पांडवांना ठार करण्याची योजना आखली होती. परंतु, पांडवांना दुर्योधनाच्या या योजनेचा सुगावा लागला आणि ते एका बोगद्याचा वापर करून तिथून पळून गेले.