रविवारी उत्तर प्रदेशाच्या बहराइचमध्ये दुर्गादेवीच्या विसर्जनादरम्यान हिंसाचाराची घटना घडली होती. या हिंसाचारात २२ वर्षीय राम गोपाल मिश्रा या तरुणाचा मृत्यू झाला होता, तर इतर सात जण जखमी झाले होते. दरम्यान, आता गोपाल मिश्रा हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांबरोबर चकमक झाल्याची माहिती पुढे आली आहे. या चकमकीत दोन आरोपी जखमी झाले असून त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. बहराइचला लागून असलेल्या भारत-नेपाळ सीमेजवळील हांडा बसेहरी या भागात ही चमकम झाल्याचं सांगितलं जात आहे.
आरोपींकडून नेपाळच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सर्फराज आणि तालीम असं जखमी झालेल्या आरोपींची नावे आहेत. गोळी लागताच त्यांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हिंसाचारादरम्यान वापरलेली शस्त्रे हांडा बसेहरी या भागात ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली होती. या शस्रांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाचही आरोपींना या भागात आणले होते. मात्र, यावेळी दोन आरोपींनी नेपाळच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव आरोपीच्या दिशेने गोळीबार करावा लागला.
हेही वाचा – बहराइच हिंसाचार प्रकरण : गोपाल मिश्राच्या मृत्यूपूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; पोलीस म्हणाले…
पोलिसांच्या गोळीबार दोन्ही आरोपींच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले. त्यानंतर त्यांना तत्काळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यासंदर्भात बोलताना उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार म्हणाले, हिंसाचारात वापरलेली शस्रे जप्त करण्यासाठी आम्ही आरोपींना घेऊन जात होते. त्यावेळी दोन आरोपींना पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. यात दोघे जखमी झाले. यावेळी पोलिसांनी शस्रेही जप्त केली आहेत.
नेमकं प्रकरण काय?
रविवारी ( १३ ऑक्टोबर ) बहराइचमध्ये दुर्गादेवीच्या विसर्जनानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक एका मशिदीसमोरून जात असताना तिथे डीजे वाजवण्यावरून काही लोकांमध्ये शाब्दीक वाद झाला. इतकेच नाही, तर काही मिनिटांत हिंसाचारही उफाळून आला. यात २२ वर्षीय गोपाल मिश्रा हा तरुण गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. गोपाल मिश्रावर गोळीबार करण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालातून पुढे आलं. गोपाल मिश्राच्या मृत्यूची बातमी कळत पुन्हा बहराइचमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली. तसेच याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होते.