लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी भारतीय जनता पार्टीला केवळ २४० जागा मिळवता आल्या आहेत. भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या टीडीपी आणि नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाला बरोबर घेऊन नरेंद्र मोदी सरकार स्थापन करतील. असं असंल तरी भारतीय जनता पार्टीने ४०० पारचा नारा दिला होता. मात्र, ४०० पारचं भाजपाचं स्वप्न भंगलं. तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. त्यापैकी निम्याही जागा भाजपाला मिळवता आल्या नाहीत.
तसेच लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षालाही मोठा धक्का बसला आहे. मायावती यांच्या पक्षाला यश मिळवता आलं नाही. उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी एकही जागा बसपाला जिंकता आलेली नाही. त्यामुळे यावर मायावती यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. “यापुढे मुस्लिमांना संधी देताना विचार करावा लागेल”, असं मायावती यांनी म्हटलं. तसंच भविष्यात तिकीट देताना विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, असं सूचक विधानही त्यानी केलं.
हेही वाचा : NDA ची बैठक संपली, आजच करणार सत्तास्थापनेचा दावा; युतीच्या प्रमुख नेतेपदी नरेंद्र मोदींची निवड
मायावती काय म्हणाल्या?
“बहुजन समाज पक्षाने मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व दिलं. मात्र, तरीही पक्षाला यश मिळवता आलं नाही. त्यामुळे यापुढे पक्ष विचार करून योग्य तो निर्णय घेईल आणि तशा प्रकारे संधी देईल. जेणेकरून निवडणुकीत पक्षाचे मोठे नुकसान होणार नाही. आगामी निवडणुकीत मुस्लिम समाजाला निवडणुकीची संधी देण्याबाबत पक्ष सावध भूमिका घेईल”, असं म्हणत मायावती यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बोलताना निराशा व्यक्त केली.
“बहुजन समाज पक्षाला आलेल्या या अपयशाचे सखोल विश्लेषण केल जाईल. तसेच पक्षाचे हित जपण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेतले जातील. तसेच दलित समाजाने दिलेल्या समर्थनाबद्दल त्यांनी यावेळी आभार व्यक्त केले. आपल्या पक्षाचा महत्त्वाचा भाग असलेल्या मुस्लिम समुदायाला या निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व देण्यात आलं. पण तरीही पक्षाला यश मिळालं नाही. त्यामुळे पक्षाचे फार नुकसान होऊ नये म्हणून पक्ष खूप विचार करून यापुडे संधी देईल”, असं मायावती यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मायावती यांनी या लोकसभा निवडणुकीत जवळपास ३५ मुस्लिम उमेदवार दिले होते. मात्र,बहुजन समाज पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
उत्तर प्रदेशात कोणत्या पक्षाला किती जागा जागा?
लोकसभा निवडणुकीत भाजपाला एकूण २४० जागा मिळल्या आहेत. तर मित्र पक्ष असासह एकूण एनडीए मिळून २९३ जागा मिळाल्या आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला ८० पैकी ३३ जागा मिळाल्या आहेत. तर समाजवादी पक्षाला ३५ जागा मिळाल्या आहेत. तसेच कॉग्रेसला ७ जागा मिळाल्या आहेत. तर अपक्षाला काही जागा मिळाल्या. उत्तर प्रदेशात या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान, या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाला एकही जागा मिळवता आलेली नाही. त्यामुळे मायावती यांना मोठा धक्का बसला आहे.