गुजरातच्या अहमदाबादमधील एका पुस्तकाच्या दुकानाबाहेर बजरंग दलाच्या सदस्यांनी ‘कामसूत्रा’ या पुस्तकाची प्रत जाळली आहे. हे पुस्तक हिंदू देव-देवतांना ‘असभ्य/आक्षेपार्ह स्थितीत’ दाखवून त्यांचा अपमान करत असल्याचं सांगत त्यांनी या पुस्तकाची प्रत जाळली आहे. इतकंच नव्हे तर यासाठी या बजरंग दलाच्या सदस्यांनी दुकान मालकाला “जर या पुस्तकाची विक्री चालूच राहिली तर पुढच्या वेळी दुकान देखील जाळून टाकू” अशी धमकी देखील दिली आहे.
बजरंग दलाच्या एका सदस्याने ‘कामसूत्रा’ या पुस्तकातील चित्र दाखवताना एक व्हिडीओ बनवला. हा व्हिडिओ प्रथम त्या पुस्तकाच्या दुकानामध्ये बनवण्यात आला होता. यावेळी याच व्हिडिओमध्ये असा आरोप करण्यात आला होता की, या पुस्तकात हिंदू देव-देवतांना असभ्य/आक्षेपार्ह स्थितीत दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांनी या पुस्तकाच्या दुकानाबाहेर जाऊन कामसूत्रा या पुस्तकाच्या प्रतीला आग लावली.
Breaking #Bajrangdal members burnt copy of #Kamasutra in an Ahmedabad bookstall for “showing Hindu deities in ‘vulgar’ positions” and threatened to burn bookstalls down if Hindu sentiments are hurt in future 1/N pic.twitter.com/4jpHZTognM
— DP (@dpbhattaET) August 28, 2021
हिंदू देव-देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही!
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या पुस्तकाला आग लावताना ‘हर हर महादेव’ आणि ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या असल्याचं देखील या व्हिडिओमध्ये दिसून आलं आहे. यापैकी एका कार्यकर्त्याने सांगितलं कि, “हे पुस्तक लेटिट्यूड नावाच्या पुस्तकांच्या दुकानात विकलं जात आहे. हा हिंदू देव-देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. त्या दुकानदाराला देखील इशारा देण्यात आला आहे. अहमदाबाद आणि इतर कोणत्या ठिकाणी हे पुस्तक विकलं जात आहे? हे तपासलं जात आहे.
राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी असाही इशारा दिला आहे की, “गरज पडल्यास आम्ही यासाठी राज्यभरात आंदोलन देखील करू.” दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण सध्या सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. युझर्सकडून विविध प्रतिक्रिया आणि मतं व्यक्त केली जात आहेत.