महिला कुस्तीगीरांना न्याय मिळवून देण्यासाठी जंतर मंतरवर धरणे आंदोलनाला बसलेल्या कुस्तीगीरांपैकी एक बजरंग पुनियाने ट्विटरच्या एका धोरणाबाबत मोठं विधान केलं आहे. लैंगित अत्याचारप्रकरणी या कुस्तीपटूंकडून ट्विटरवर वेगवेगळ्या मागण्यांशी संबंधित हॅशटॅग ट्रेंड केले जात आहेत. याला सर्वसामान्यांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आता बजरंग पुनियाने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करणारा हॅशटॅग ट्विटरने ट्रेडिंग लिस्टमधून काढल्याचा गंभीर आरोप केला. त्याने ट्वीट करत याबाबत भूमिका मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बजरंग पुनिया म्हणाला, “ट्विटरने #arrest_brijbhushan_now या हॅशटॅगला ट्रेंडिंग लिस्टमधून काढून टाकलं आहे. आता ट्वीट ट्रेंड करण्यासाठीही महिला कुस्तीपटूंना सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल का?”

“आंदोलनाच्या ठिकाणी वीज, पाणी पुरवठा बंद करण्यात आला”

“देशाच्या मुली आज अन्यायाविरोधात लढत आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी वीज, पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यानंतरही ही लढाई सुरूच आहे. अन्यायाविरोधातील या लढाईत आम्ही आपल्या मुलींच्या बरोबर उभे आहोत. आम्ही या मुलींचा आवाज होत आहोत. तुम्हीही तुमचं कर्तव्य पार पाडा आणि बरोबर या,” असंही आवाहन बजरंग पुनियाने केलं.

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर ‘पोक्सो’सह आणखी एका कलमांतर्गत गुन्हा दाखल

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्या विरुद्ध दोन गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पोक्सो कलमाअंतर्गत एका गुन्हाचा समावेश आहे. दिल्लीतील कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

“आंदोलनाला वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न”

दरम्यान, याआधी बजरंग पुनिया म्हणाला होता, “आमच्या आंदोलनाचा वापर राजकीय फायद्यासाठी होऊ देणार नाही. आम्ही आंदोलन वेगळय़ा दिशेने जाऊ देणार नाही. हा लढत केवळ महिला कुस्तीगीरांचा नाही, तर भारताच्या मुलींच्या न्यायासाठीचा आहे.” मात्र, असे कोण करत आहे असा प्रश्न केल्यावर बजरंगने काहीच उत्तर दिले नाही. आंदोलनाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी वडेरा, भूपिंदर सिंह हुडा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक, दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी सिंग, सुर्बाह भारद्वाज अशा मोठ्या नेत्यांनी जंतर मंतरवर आंदोलक कुस्तीगीरांची बैठक घेतली आहे. यातील काहींना विनेशने प्रसारमाध्यमांसमोरही आणले होते.

“आमच्यासाठी सर्वच जण आदरास पात्र आहेत. यात संवैधानिक पदे भूषविणाऱ्यांपासून सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत सर्वच जण येतात. आम्ही प्रत्येकाचा आदर करतो. आम्ही कुणाच्याही विरोधात बोलणार नाही. आमचा लढा हा न्यायासाठी आहे. त्याचा राजकीय वापर होत असेल, तर आम्हाला ते आवडणार नाही,” असे विनेशने सांगितले. पण, कोण वेगळे वळण देत आहे याबाबत बजरंगप्रमाणे विनेशही काहीच बोलला नाही. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यापूर्वी आंदोलक कुस्तीगीर आमचा तपास यंत्रणेवर विश्वास नाही असे म्हणत होते. आता गुन्हा दाखल झाल्यावर त्याच्यातील मजकुरावर समाधानी आहात का ? असे विचारल्यावर मात्र ते आमच्या वकिलांशी बोला असे सांगत आहेत.

हेही वाचा : “आमचे आंदोलन कमजोर करू नका…”, विनेश फोगाट यांची बबिता फोगाट यांना हात जोडून विनंती; म्हणाल्या…

कुस्तीगीरांनी यावेळी राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचे टाळत असल्याचा ब्रिजबूषण सिंह यांचा आरोप फेटाळून लावला. “राष्ट्रीय स्पर्धा टाळण्याचा प्रश्नच येत नाही. मी आतापर्यंत फक्त चार राष्ट्रीय स्पर्धा खेळलेली नाही. अर्थात, यामागे दुखापतीचे कारण होते. हे आंदोलन कोण राष्ट्रीय स्पर्धेत खेळतो किंवा नाही याबाबत नाही, तर लैंगिक छळाबद्दलचे आहे. कोणताही खेळाडू हा देशापेक्षा मोठा नसतो,” असे बजरंग म्हणाला.

“दिल्ली पोलिसांकडून आमचा छळ होत आहे. रात्री आमचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. आम्हाला अन्न, पाणी, गाद्या, लाकडी खाट आणू दिले नाही. आंदोलनस्थळी वस्तू घेऊन आलेल्या कामगारांपैकी एकही घरी पोचलेला नाही. हा छळ नाही, तर काय आहे,” असाही प्रश्न बजरंगने विचारला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajrang punia big statement about twitter trending hashtag pbs
Show comments