कुस्तीपटू विनेश फोगट आणि बंजरंग पुनिया यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे नेते बृजभूषण शरण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली होती. माझ्या विरोधात झालेलं आंदोलन मुळात खेळाडूंचं आंदोलन नव्हतं. तर ते काँग्रेसचं आंदोलन होतं, हे आता स्पष्ट झालं आहे, असं ते म्हणाले होते. तसेच विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी फसवणूक केली, त्याची शिक्षा तिला भोगावी लागली, अशी टीकाही त्यांनी केली होती. दरम्यान, त्यांच्या या टीकेला आता कुस्तीपटू बंजरंग पुनिया यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
बजरंग पुनिया यांनी नुकताच इंडिया टुडेशी संवाद साधला. यावेळी त्यांना बृजभूषण शरण सिंह यांच्या टीकेबाबत विचारण्यात आलं. याबाबत बोलताना, “बृजभूषण शरण सिंह यांच्या टीकेवरून त्यांची देशाप्रती असलेली मानसिकता पुढे आली आहे. ऑलिम्पिकमधील पदक हे केवळ विनेशचं पदक नव्हतं, तर ते १४० कोटी भारतीयांचे पदक होतं. हे पदक भारताने गमावलं, याचा त्यांना आनंद झाला आहे”, अशी प्रतिक्रिया पुनिया यांनी दिली.
पुढे बोलताना, “पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने ज्याप्रकारे पदक गमावलं, ती देशासाठी दु:खद बाब होती. परंतु भाजपाच्या आयटी सेलने विनेशची खिल्ली उडवण्याची मोहीम चालवली होती”, असा आरोपही बजरंग पुनिया यांनी केला. तसेच “ज्यांनी विनेशच्या अपात्रतेचा आनंद साजरा केला, ते देशभक्त आहेत का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, काँग्रेस प्रवेशाबाबत विचारलं असता, काँग्रेसने कठीण काळात कुस्तीपटुंना साथ दिली. त्यामुळे आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असं बजरंग पुनिया म्हणाले. तसेच मी हरियाणा विधानसभा निवडणूक लढणार नसून केवळ विनेश फोगट निवडणूक लढवेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला काँग्रेस राज्यसभेवर पाठवणार का? असं विचारलं असता, याबाबत पक्ष योग्य काय तो निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया बजरंग पुनिया यांनी दिली.
बृजभूषण शरण सिंह नेमकं काय म्हणाले होते?
आज सकाळी माध्यमांशी बोलताना, “तुम्ही माध्यमं ज्या आंदोलनाबाबत बोलता, माझ्यावर टीका करता ते आंदोलन मुळात खेळाडूंचं आंदोलन नव्हतं. ते काँग्रेसचं आंदोलन होतं. विनेश-बजरंगच्या काँग्रेस प्रवेशानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की काँग्रेसने माझ्याविरोधात षडयंत्र रचलं होतं. मला हरियाणाच्या जनतेला सांगायचं आहे की बजरंग आणि विनेशने मुलींच्या सन्मानासाठी आंदोलन केलं नव्हतं. त्यांनी केवळ त्यांच्या व काँग्रेसच्या राजकारणासाठी आपल्या लेकींचा वापर केला, त्यांच्या सन्मानाला धक्का लावला, त्यांचा अपमान केला. ते कधीच मुलींच्या सन्मानासाठी आंदोलन करत नव्हते. ते केवळ राजकारणासाठी आंदोलन करत होते”, अशी प्रतिक्रिया बृजभूषण शरण सिंह यांनी दिली होती. तसेच विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी फसवणूक केली, त्याची शिक्षा तिला भोगावी लागली, असेही ते म्हणाले होते.
© IE Online Media Services (P) Ltd