भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण शरण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या विरोधात काही खेळाडू जंतर-मंतरवर आंदोलनाला बसले आहेत. गेल्या १२ दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. त्यातच बुधवारी (३ मे) रात्री खेळाडू आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याची घटना समोर आली. दरम्यान, यासंदर्भात बोलताना कुस्तीपटू बंजरंग पुनियाने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले. एनडीटीव्हीशी बोलताना त्याने प्रतिक्रिया दिली. यावेळी बंजरंग पुनिया भावूक झाल्याचं बघायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – महिला कुस्तीपटू लैंगिक छळ प्रकरण: “जंतरमंतरवर तुम्हाला न्याय मिळणार नाही”, बृजभूषण सिंह यांचं विधान

काय म्हणाला बंजरंग पुनिया?

“गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत पाऊस सुरू असल्याने आम्ही झोपण्यासाठी बेड आणले होते. मात्र, त्यावर दिल्ली पोलिसांनी आक्षेप घेतला. तसेच त्यांनी खेळाडूंबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी आम्हाला मारहाणही केली”, अशी प्रतिक्रिया बंजरंग पुनियाने दिली.

हेही वाचा – Video : “देशासाठी आम्ही…”, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांना भर पत्रकार परिषदेत कोसळलं रडू; लैंगिक शोषणप्रकरणी पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन

पुढे बोलताना त्याने केंद्र सरकारला सर्व पदके परत करण्याचाही इशारा दिला. “दिल्ली पोलीस ब्रिजभुषण शरण सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या व्यक्तीविरोधात आम्ही तक्रार दाखल केली. त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. मात्र, देशासाठी पदकं जिंकणाऱ्या खेळाडूंबरोबर गैरवर्तन केलं जातंय. जर सरकारला आमचा आदर करता येत नसेल, तर आम्ही सर्व पदकं परत करू”, असेही तो म्हणाला.

हेही वाचा – Video : पी. टी. उषा यांनी जंतर मंतरवर घेतली आंदोलक कुस्तीपटूंची भेट, नेमकी चर्चा काय?

यासंदर्भात बोलताना कुस्तीगीर विनेश फोगाटनेही दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले. “आम्ही बेड मागवले, तेव्हा पोलिसांनी त्यावर आक्षेप घेतला. पोलिसांनी आम्हाला शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी काही पोलिसांनी मद्यप्राशनही केलं होते. हे दिवस पाहण्यासाठी आम्ही देशासाठी पदके आणली होती का?”, असा प्रश्न तिने केंद्र सरकारला विचारला.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी कुस्तीगीरांना मारहाण झाल्याचा आरोप फेटाळत एक निवेदन जारी केले आहे. “आप नेते सोमनाथ भारती कोणत्याही परवानगीशिवाय खाट घेऊन जंतरमंतरवर आले होते. ट्रकमधून खाट काढण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी हस्तक्षेप केला. तेव्हा काही किरकोळ भांडण झाले. याप्रकरणी सोमनाथ भारतीसह अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.”, असं पोलिसांनी या निवेदनात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajrang punia warn central government to return all medals after dispute with delhi police spb