शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना गुरुवारी राज्यसभेत श्रद्धांजली वाहाण्यात आली. बाळासाहेबांव्यतिरिक्त माजी केंद्रीय मंत्री के. सी. पंत व भारताचे माजी मुख्य न्यायाधीश रंगनाथ मिश्र यांच्यासमवेत एकूण आठ जणांना राज्यसभेत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज्यसभेचे माजी सदस्य बी.व्ही. कक्किलाया, रंगनाथ मिश्र, जगेश देसाई, बी. पी. सिंघल, बी. सत्यनारायणन रेड्डी, अनंतराय देवशंकर दवे, कैलाशपती मिश्रा आणि के.सी. पंत यांचे निधन झाल्याची माहिती सभागृहाला दिली. अन्सारी यांनी आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात ८६ वर्षीय बाळासाहेब ठाकरे हे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत जनमानसात लोकप्रिय होते असे सांगून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेमध्ये मराठी अस्मिता सदैव जागवली, असे ते म्हणाले.फ्री प्रेस जर्नल या दैनिकात व्यंगचित्रकार म्हणून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या बाळासाहेबांनी सन १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना करताना महाराष्ट्रातील जनतेत मराठी अस्मिता जागवण्याचा सदैव पुरस्कार केला, याचाही त्यांनी गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला.   

Story img Loader