राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवलं आहे. राज्यातल्या २०० जागांपैकी ११० जागा भाजपाने जिंकल्या आहेत. भाजपाने काँग्रेसच्या ताब्यात असलेलं हे हाज्य हिसकावलं आहे. दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी भाजपा राजस्थानात सत्ता स्थापन करू शकलेली नाही. पक्ष अद्याप राज्यात कोणाला मुख्यमंत्री करायचं याचा निर्णय घेऊ शकलेला नाही. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया, दिया कुमारी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत आणि राजस्थानचे ‘योगी’ अशी ओळख असलेले महंत बालकनाथ हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. दरम्यान, राज्यात मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी भाजपाने पर्यवेक्षकांची नेमणूक केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे, सरोज पांडेय यांना राजस्थानचे पर्यवेक्षक म्हणून नेमलं आहे. हे तीन नेते राजस्थानमधील भाजपा आमदारांशी चर्चा करून मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेतील.
दरम्यान, महंत बालकनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचं बोललं जात आहे. कारण त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मी पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे पहिल्यांदा खासदार आणि आता आमदार झालो आहे. यानिमित्ताने मला राष्ट्रसेवेची संधी मिळाली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमांवर जी चर्चा चालू आहे त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष करावं. मला सध्या पंतप्रधानांच्या मार्गदर्शनात अधिक अनुभव घ्यायचा आहे.
भाजपाने गोरखपूर मठातील महंत योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद दिलं आहे. त्याचप्रमाणे मस्तनाथ मठाचे महंत बालकनाथ यांना राजस्थानचे मुख्यमंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा होती. परंतु, या चर्चेला बालकनाथ यांनी आता पूर्णविराम दिला आहे. बालकनाथ हेदेखील योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे नाथ संप्रदायाचे अनुयायी आहेत. योगी आदित्यनाथ हे स्वतः बालकनाथ यांचा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आले होते. आदित्यनाथ यांनी बालकनाथ यांच्यासाठी एक रॅली आणि प्रचारसभादेखील घेतली होती.
हे ही वाचा >> कपाटात ठासून भरलेले पैसे मोजता मोजता मशीनही बंद पडल्या, आतापर्यंत मिळालेले घबाड किती?
राजस्थानच्या राजकारणात योगी बालकनाथ म्हणून प्रसिद्ध असलेले बालकनाथ हे आक्रमक हिंदुत्वाचं राजकारण करतात. तिजारा या मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. योगी बालकनाथ यादव जातीचे आहेत. ओबीसी असल्याने त्यांना मुख्यमंत्रिपद देऊन भाजपा इथे ओबीसी कार्ड खेळू शकते, असं बोललं जात होतं. परंतु, या शक्यता आता संपुष्टात आल्या आहेत.