शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा दिल्लीच्या महाराष्ट्र सदन येथील प्रांगणात उभारला जावा, अशी विनंती खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचं मोठं योगदान असून त्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी राज्य सरकारने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी पत्राद्वारे केली आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन हा महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचा आरसा आहे. या वास्तूच्या प्रांगणात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांसह अन्य महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात आले आहेत, असा संदर्भ शेवाळे यांनी या पत्राच्या सुरुवातीला दिलाय.
जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार, पत्रकार, संवेदनशील राजकारणी, प्रभावी वक्ते म्हणून देशभरात बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सामान्य जनतेच्या मनात अपार श्रद्धा आहे. स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यांसह अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान आहे, असं शेवाळे यांनी पत्रात म्हटलंय.
बाळासाहेबांच्या विचारांची प्रेरणा भावी पिढ्यांना मिळत राहावी, या हेतूने बाळासाहेब ठाकरे यांचा पू्णाकृती पुतळा महाराष्ट्र सदनाच्या आवारात उभारून त्यांचा यथोचित गौरव करावा, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे.