Odisha Railway Accident : ओडिशामधल्या बालासोर या ठिकाणी झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या प्रकरणात रेल्वेच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये सिनीयर सेक्शन इंजिनिअर अरुण कुमार महांतो, सिनीयसर सेक्शन इंजिनिअर मोहम्मद आमिर खान आणि टेक्निशयन पप्पू कुमार यांना अटक करण्यात आली आहे. कलम ३०४ आणि कलम २०१ अन्वये या तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
मागच्या महिन्यात २ जून रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोरोमंडल एक्स्प्रेसने एका मालगाडीला धडक दिली. त्यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेस काही डबे बंगळुरु हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसवर आदळले. या भीषण अपघातात २९० हून जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला. एक हजाराहून जास्त प्रवासी जखमी झाले. संपूर्ण देश या घटनेमुळे हादरला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सीबीआयकडे तपास देण्यात आला होता. सीबीआयच्या चौकशी पथकाने घटना स्थळाची पाहणी केली होती. त्यानंतर आज काही वेळापूर्वीच तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अहवालात काय उल्लेख आहे?
दोन दिवसांपूर्वीच रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ओडिशातील रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वे बोर्डाला अहवाल सादर केला. त्या अहवालात सिग्नलिंगच्या कामात कमतरता असल्याची नोंद होती. त्याचप्रमाणे बहनगा बाजार या ठिकाणी स्टेशन व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांना दोन समांतर ट्रॅकमधल्या त्रुटी लक्षात आणून दिल्या असत्या तर उपाय योजता आले असते. मात्र तसे घडलं नाही असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या अपघाताचं मुख्य कारण चुकीचा सिग्नल होता असंही म्हटलं गेलं आहे. त्याचप्रमाणे सिग्नलिंग विभागाकडून अनेक पातळ्यांवर चुका झाल्या होत्या. त्या घडल्या नसत्या तर हा अपघात टाळता आला असता असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.