अहमदाबादमधल्या दरियापूर काडियानाका परिसरात एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीचा भाग कोसळला आहे. यावेळी बाल्कनीखाली रथयात्रेचं दर्शन घेत उभ्या असलेल्या लोकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन लहान मुलांसह एकूण १० जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास रथयात्रा काडियानाका येथे पोहोचली होती. यावेळी रथ पाहायला आणि दर्शनासाठी हजारो लोक जमले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली.
अहमदाबादच्या जमालपूर येथील भगवान जगन्नाथ मंदिरातून सकाळी ७.४० वाजता रथयात्रा काढण्यात आली होती, जी सायंकाळी ५ वाजता दरियापूरला पोहोचली. येथील एका मंदिराजवळ तिन्ही रथ १५ मिनिटं उभे होते. येथे पूजा आणि आरती केल्यानंतर रथ कडियानाक्याच्या दिशेने रवाना झाले. याचदरम्यान, कडियानाका परिसरात ही दुर्घटना घडली. रथ आता कडियानाक्याहून पुढे रवाना झाले आहेत.
या दुर्घटनेला अहमदाबाद महानगरपालिका जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. कारण रथ यात्रेच्या मार्गावरील धोकादायक आणि जीर्ण इमारती आणि घरांना नोटिसा पाठवायला हव्या होत्या. परंतु तपासानंतरही या (दुर्घटनाग्रस्त) इमारतीला नोटीस पाठवली नव्हती. जखमींना जेव्हा लोक रुग्णालयात नेत होते. त्याचवेळी महापालिकेचे अधिकारी या इमारतीसाठीची नोटीस घेऊन तिथे दाखल झाल्याचं वृत्त दैनिक भास्करने प्रसिद्ध केलं आहे.
हे ही वाचा >> “गद्दारांना गद्दार म्हणायची ताकद माझ्यात आहे, हिंमत असेल तर…”, सुप्रिया सुळे याचं शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान
भगवान जगन्नाथांच्या रथयात्रा मंगळवारी (२० जून) संपूर्ण देशभरात काढल्या जात आहेत. ओडिशामधल्या पुरी येथे काढल्या जाणाऱ्या रथयात्रेनंतरची दुसरी सर्वात मोठी रथयात्रा ही अहमदाबादमधल्या जमालपूर येथील भगवान जगन्नाथ मंदिराद्वारे काढली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सकाळी या मंदिरात जाऊन मंगला आरती केली होती.